नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता तपोवनात साधुग्राम उभारण्यासाठी जागा देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, मंगळवारी यासंदर्भात जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी, तात्पुरती जमीन अधिग्रहित करण्यापेक्षा कायमस्वरूपी खरेदी करा असा आग्रह धरून, जबरदस्तीने जमीन अधिग्रहण करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी आत्महत्त्या करतील, असा इशारा दिल्याने अखेर कोणत्याही ठोस निर्णयाअभावी बैठक गुंडाळावी लागली. पुढील वर्षी नाशकात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अधिग्रहित करावयाच्या १६९ एकर जागेसाठी गेल्या महिन्यातच जवळपास १८२ शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे जाणून घेतले असता, शेतकऱ्यांनी जागा अधिग्रहित करण्यास नकार दिला. त्यामुळे यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुसार मंगळवारी दुपारी ही बैठक झाली. शेतकऱ्यांनी बैठकीच्या प्रारंभीच सिंहस्थ कुंभमेळ््यासाठी प्रत्येक वेळी जमीन अधिग्रहण करण्यापेक्षा कायमस्वरूपी बाजारभावाप्रमाणे त्याचे भूसंपादन करावे किंवा दहापट टीडीआर द्यावा, अशी मागणी केली. साधुग्रामसाठी जागा घेतल्यावर तेथे खडी, वाळू व सीमेंट टाकून मोठे नुकसान केले जात असल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली. त्यावर महापालिकेने जमीन पूर्वस्थितीत आणून देण्याचे आश्वासन देताच शेतकरी खवळून उठले. कपिला संगमावर ड्रेनेजचे पाणी सोडतात, ते थांबवू शकले नाहीत; जमीन कशी सुस्थितीत करून देणार, असा सवाल केल्याने महापालिकेचे अधिकारी निरुत्तर झाले.
सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता जागा देण्यास विरोध
By admin | Published: October 08, 2014 1:28 AM