मालेगाव : शहर भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्यावतीने शहरातील अघोषित लॉकडाऊनला विरोध करण्यात आला असून, याबाबत मालेगाव शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रकाश सुराणा यांनी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस निरीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलीस अधीक्षक लता दोंदे यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, ५ ते ३० एप्रिलपर्यंत शासनाने अघोषित संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला असून, त्यात फक्त अत्यावश्यक सेवाना सूट देण्यात आली आहे. संपूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये अशाच प्रकारे सूट देण्यात आली होती. सध्या संपूर्ण लॉकडाऊन आहे असे म्हणावे लागेल. मागील वर्षाच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी - व्यावसायिक व कामगारवर्गाचा आर्थिक कणा मोडला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन म्हणजेच व्यापारी - व्यावसायिक व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे. मागील लॉकडाऊनच्या संकटातून सावरत असताना पुन्हा व्यापारीवर्ग उभे राहण्याची तयारी करीत होता, कामगारांच्या हाताला काम मिळत होते. निवेदनावर उत्तर महाराष्ट्र व्यापारी आघाडी प्रमुख समन्वयक नितीन पोफळे, महानगर अध्यक्ष मदन गायकवाड, मालेगाव शहर व्यापारी आघाडी अध्यक्ष प्रकाश सुराणा, सरचिटणीस बालचंद छाजेड, रूपेश कांकरिया, पारस डी. अग्रवाल, उपाध्यक्ष नीरज खंडेलवाल, विकी शर्मा, घनश्याम वर्मा, सौरभ कोतकर यांच्या सह्या आहेत.
-----------------------------
कामगारवर्ग हादरला
अचानक अघोषित लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यापारी - व्यावसायिक व कामगारवर्ग हादरला आहे. बँकेचे देणे, वीजबिल, इतर टॅक्स अशासारखी प्रमुख देणी असताना मागील लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने व स्थानिक प्रशासनाने व्यापार्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत अर्थात वीज बिल, कुठल्याही करात सवलत दिली नाही. कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी ठराविक निर्बंधांची गरज आहे. अशा परिस्थितीवर मात करून व्यापारी, व्यावसायिक वर्गास दिलासा मिळेल, असा निर्णय अपेक्षित आहे.
-------------
बाजारपेठा बंद
विविध धर्मियांचे सण, उत्सव येत असून, संपूर्ण बाजारपेठा बंद असल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. किमान सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करून सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत व्यापार सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, पोलीस व प्रशासनाने व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई करू नये, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी व्यापारी-व्यावसायिक वर्गाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, मालेगावकरांना दिलासा मिळेल, असे बदल करावेत, आदी मागण्यांचा समावेश आहे.
--------------
मालेगाव शहर भाजप व्यापारी आघाडीतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नितीन पोफळे, प्रकाश सुराणा आदी उपस्थित होते. (०७ मालेगाव १)
===Photopath===
070421\07nsk_7_07042021_13.jpg
===Caption===
०७ मालेगाव १