नाशिक : कोरोनाबाधितांना बेड मिळत नाही तसेच ऑक्सिजन व अन्य सुविधा मिळत नसून शहरातील महापालिका आणि खासगी रुग्णालयांतील अवस्था चव्हाट्यावर आली आहे. त्यावर शुक्रवारी (दि.९) प्रशासनाला आणि पर्यायाने भाजपाला खिंडीत गाठण्याची विरोधकांची तयारी व्यर्थ गेली. काेरोना काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करून महापौर सतीश कुलकर्णी यांनी कामकाज तत्काळ संपवले आणि विरोधकांच्या संघर्षाची हवाच काढून घेतली.
महापालिकेची महासभा शुक्रवारी (दि.९) सकाळी साडेअकरा वाजता महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. कोरोनामुळे बळी गेलेल्या नागरिक आणि कोरोना योद्धयांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच महासभेच्या पटलावर असलेली सर्व विकासकामे मंजूर करून धेारणात्मक विषय तहकूब केल्याचे त्यांनी जाहीर केले. सध्या शहरात दिवसाला तीन ते चार हजार रुग्ण आढळत असून प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे खच्चीकरण न करता सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आणि महासभेचे कामकाज संपवले.
महासभेचे कामकाज चर्चेविना संपवल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला. शहरात कोरोनाबाधितांची अवस्था बिकट असताना सत्तारूढ भाजपाने चर्चा न घेताच पळ काढला, असा आरोप त्यांनी केला.
...इन्फो...
कोराेनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरात महापालिकेच्या तर सोडाच; परंतु खासगी रुग्णालयातदेखील बेडस मिळत नाहीत अशी अवस्था आहे. त्यावर महासभेत चर्चा करायची नाही तर कुठे करायची असा प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केला.