नाशिक : महापालिकेत स्पष्ट बहुमत प्राप्त केल्यानंतर भाजपात आता महापौर-उपमहापौर पदांसह विविध सत्तापदांच्या वाटणीबाबत खल सुरू झाला आहे. महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे, तर उपमहापौरपदासाठी माजी आमदार व माजी महापौर वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते यांचे नाव पुढे आल्याने पक्षांतर्गत मतभेदही दिसून येत आहेत. सत्तापदांची वाटणी होताना नव्या-जुन्यांचा वाद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाने ६६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. त्यामुळे भाजपाचाच महापौर-उपमहापौर बसणार हे स्पष्ट झाले आहे. महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून, या प्रवर्गातून ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी, पुंडलिक खोडे, सुरेश खेताडे, प्रा. सरिता सोनवणे व रुपाली निकुळे हे निवडून आले आहेत. मात्र, पाचव्यांदा महापालिकेत प्रवेश करणाऱ्या रंजना भानसी यांच्या नावाची शिफारस स्थानिक कार्यकारिणीने प्रदेशकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ४भाजपाचे ६६ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपाने महापौर-उपमहापौरपद हे सव्वा-सव्वा वर्षासाठी देण्याचे ठरविले आहे, तर स्थायी समितीवरही एक वर्षाचा कालावधी असणार आहे. याशिवाय, सभागृहनेता, महिला व बालकल्याण सभापती, शिक्षण सभापती व सदस्य, प्रभाग समित्यांचे सभापती आदि विविध पदे असल्याने सर्वांनाच पदांचा लाभ मिळणार असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे काही नगरसेवकांना पक्षाकडून सबुरीचाही सल्ला दिला जात आहे.
उपमहापौरपदावरून भाजपात मतभेद
By admin | Published: March 07, 2017 2:22 AM