घोटी : इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यास इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांनी शिवसेनेच्या माध्यमातून कडवा विरोध केला आहे. कोणत्याही स्थितीत तालुक्यातील धरणातून जायकवाडीसाठी पाण्याचा एक थेंब ही जाऊ देणार नाही अशी आक्र मक भूमिका शिवसेनेचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी घेत गुरुवारी (दि.२५) सकाळपासूनच धरणावर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान हा विरोध झुगारून शासनाने पाणी सोडण्याचा प्रयत्न केल्यास सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.मराठवाड्यातील जायकवाडी धरणात इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणसमूहातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने तसेच या धरणातून गुरु वारपासून पाणी सोडण्याचे जाहीर झाल्याने तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकºयांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली दारणा धरणावर ठिय्या आंदोलन केले. दारणा धरण समूहातुन मराठवाड्याला सोडण्यात येणाºया पाण्याला इगतपुरी तालुका शिवसेनेने कडवा विरोध केला आहे. आंदोलनात माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह भाऊसाहेब गायकर,तुकाराम गायकर,अंबादास धोंगडे,राजाराम गव्हाणे,गोकुळ गुळवे,धनाजी जाधव,सुखदेव धोंगडे,एकनाथ रायकर,भरत गायकर,हनुमान झोमान,निवृत्ती पाळदे,तुकाराम गायकर,चंद्रकांत गायकर,रंगनाथ खातळे, देविदास मोरे,सोमनाथ पागेरे,मधुकर गव्हाणे,अनिल गायकर,सुखदेव गायकर,सुदाम गायकर,नारायण गायकर,सुनील पागेरे आदींसह शेकडो शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.