स्थायी समितीच्या सदस्यांची निवड गेल्या महिन्यात २४ फेब्रुवारीस झाली. त्यानंतर सभापतीपदाची निवडणूक होण्याच्या आतच भाजपचे जवळपास सर्वच सदस्य अहमदाबाद येथे सहकुटूंब सहलीवर गेले आहेत. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याच ताब्यात राहाव्यात यासाठी भाजपची धावपळ सुरू आहे. नव्या रचनेनुसार समितीत भाजपचे आठ, शिवसेनेचे पाच आणि काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच मनसेचे एकेक सदस्य आहेत. भाजपव्यतिरिक्त विरोधकांचे आठ सदस्य असल्याचा दावा केला जात असला तरी मनसेने गेल्या महापौरपदाच्या निवडणुकीपासून भाजपला साथ देणे सुरू केले आहे. यंदाही स्थायी समितीतील मनसेचे सलीम शेख भाजपबरोबर असून अगोदरच अहमदाबादला गेलेल्या भाजपच्या कॅम्पमध्ये जाऊन नंतर ते अजमेर शरीफला गेले हेाते.
शिवसेनेचे पाच सदस्य आता साेमवारी (दि.१) सहलीवर रवाना झाले आहेत. इगतपुरीतील एका हॉटेलवर मुक्काम ठोकून ते नंतर रवाना होणार आहेत. विरोधी पक्षातील राहुल दिवे आणि समीना मेमन हेदेखील शिवसेनेबरोबर असून तेदेखील लवकरच कॅम्पमध्ये दाखल हेातील, असा दावा विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केला आहे.