शिवाजी नगरच्या संदेश कॉलनी परिसरात मोबाइल टॉवर उभारणीचे काम सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्याला तीव्र विरोध दर्शवत काम बंद पाडले. मोबाइल टॉवरपासून निर्माण होणाऱ्या रेडिएशनमुळे मानवी आरोग्याला धोका आहे. तसेच रहिवासी वस्तीत असे टॉवर उभारणीला परवानगी नसताना सदरचे काम बिनदिक्कत रेटण्यात येत आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
ठेकेदाराला वीज वितरण तसेच नगरपालिकेकडील परवानगीबाबत विचारणा केली असता त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. संबंधित खासगी मालमत्ताधारकही रहिवाशांना अरेरावी करीत आहेत. नगर परिषदेत तसेच वीज वितरण कंपनीकडे टॉवर उभारणीला विरोध असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांनी अशा टॉवरला परवानगीच दिलेली नसल्याचे रहिवाशांना सांगितले. याउपरही ठेकेदाराकडून काम उरकले जात होते. त्यामुळे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रीकचे काम करणाऱ्या ठेकेदाराला खडसावत साहित्य काढून घेण्यास सांगितले.
दरम्यान, रहिवाशांच्या आरोग्याला धोका पोहचविणाऱ्या मोबाइल टॉवरचे काम तत्काळ थांबविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवाजी नगर व संदेश कॉलनी परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
इन्फो
नगरपालिकेच्या भूमिकेविषयी शंका
एकीकडे नगरपालिका सदर कामाला परवानगी दिलेली नसल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे ठेकेदार काम पुढे रेटत असल्याने नगरपालिकेच्या भूमिकेबाबत स्थानिक रहिवाशांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी माहिती अधिकारांतर्गत नगर परिषदेकडे याबाबत माहिती मागितली आहे. तसेच नगरपालिका व मोबाइल टॉवरची उभारणी करणारी ठेकेदार कंपनी यांना बेकायदेशीर काम करत असल्याबद्दल रितसर नोटीस बजावण्याची तयारी केली असल्याचे समजते.