नाशिक : इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांना शिवसेनेतील प्रवेश दिवसागणीक अडचणीत आणणारा ठरत असून, विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून मिळणाऱ्या संभाव्य उमेदवारीला ठिकठिकाणी बैठकांमधून होणारा विरोध आता फलकबाजीच्या माध्यमातून रस्त्यांवर येऊन ठेपला आहे. गावित यांच्याकडून विविध कामांबाबत घेतल्या जाणाºया श्रेयाला विरोधकांनी आक्षेप घेत त्यांनी ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा आरोप या फलकाद्वारे केला आहे. गावित यांच्याबाबत विरोधाची धार तीव्र बनत चालल्याने शिवसेनेच्या गोटात चिंतेचे ढग जमू लागले असतानाच पक्षाने विरोध डावलून उमेदवारी दिल्यास अडचणी वाढण्याची भीती शिवसैनिकांमधून व्यक्त केली जाऊ लागली आहे.कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी हाती शिवबंधन बांधत शिवसेनेच्या उमेदवारीवर दावा सांगितला आहे. तेव्हापासून शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांसह निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता धुमसत आहे. त्यातूनच इगतपुरी-त्र्यंबक तालुक्यातील तीन माजी आमदारांसह जिल्हा परिेषद आणि पंचायत समित्यांचे काही आजी-माजी पदाधिकारी हे एकवटले जाऊन त्यांनी ठिकठिकाणी बैठकांचा धडाका लावत निर्मला गावितांविरोधात मोहीमच उघडली. गावित यांच्यावर असलेले विविध आरोप लक्षात घेता त्यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना साकडेही घातले असल्याचे सांगितले जाते. गावित यांच्या विरोधात गावोगावी बैठका घेतल्या जात असतानाच आता गावितांविरोधातील संघर्ष रस्त्यांवर येऊन ठेपला आहे.सदर फलकाबाबत संबंधित प्रकाशकांनी अनभिज्ञता दर्शविली असली तरी, गेल्या दीड महिन्यापासून गावितांविरोधी सुरू असलेली मोहीम पाहता ही फलकबाजी त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी सदर फलक नंतर काढून टाकले असले तरी निर्मला गावित यांच्या विरोधातील ढग अधिक गडद होत चालले असल्याची चिन्हे दिसून येत आहे.शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्षसध्या सेना-भाजप युतीत एकेका जागेवरून झगडा सुरू असताना शिवसेनेकडून गावितांना पसंती दिल्यास उमेदवारी धोक्यात येण्याची भीती निष्ठावंत शिवसैनिकांमधून व्यक्त केली जात आहे. शिवसेना या सर्व घडामोडींबाबत कशाप्रकारे प्रतिसाद देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.गावित यांनी काही दिवसांपूर्वीच घोटी शहरात पाणीपुरवठा योजनेसह मंदिराच्या सभामंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला होता. यासह शहरातील विविध कामांना आमदार निधी मंजूर नाही आणि शासनाने त्याबाबत कोणताही कार्यादेश जारी केलेला नसतानाही गावित यांच्याकडून ग्रामस्थांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करणारे फलक घोटी शहरात झळकले आहेत. या फलकांवर प्रकाशक म्हणून तीन माजी आमदारांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकाºयांची नावे टाकण्यात आलेली आहेत.
निर्मला गावितांबद्दलचा विरोध आता रस्त्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:36 AM
इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांना शिवसेनेतील प्रवेश दिवसागणीक अडचणीत आणणारा ठरत असून, विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून मिळणाऱ्या संभाव्य उमेदवारीला ठिकठिकाणी बैठकांमधून होणारा विरोध आता फलकबाजीच्या माध्यमातून रस्त्यांवर येऊन ठेपला आहे.
ठळक मुद्देफलकबाजीतून आरोप : निष्ठावंत शिवसैनिकांच्या गोटात चिंतेचे ढग