नाशिक : देशभरातील नागरिकांना घातक ठरणारे शेतकरीविरोधी कायदे, वाढती पेट्रोल, डिझेल दरवाढ, कामगारविरोधी कायदे यांच्याविरोधात देशातील ५००पेक्षा अधिक शेतकरी संघटना तसेच २०पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्यावतीने सोमवारी (दि. २७) देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी रविवारी मुख्य बाजारपेठेत तसेच शहरातील ६ विभागांतील प्रमुख बाजारपेठा आणि उपनगरांमध्ये फेरी मारुन सोमवारी बंद राखण्याचे आवाहन व्यापारी आणि व्यावसायिकांना केले.
शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी यांनी जमा होऊन सोमवारच्या बंदबाबत नियोजनाची आखणी केली. यावेळी उपस्थित असलेले काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, शाहू खैरे, वत्सला खैरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, भाकपाचे राजू देसले, शेकापचे ॲड. मनीष बस्ते, तानाजी जायभावे, राजेंद्र बागुल, गुलाम शेख, हंसराज वडघुले, नाना बच्छाव, प्रभाकर वायचळे, योगेश कापसे, अण्णा मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी एम. जी. रोडपासून मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मेन रोड अशा सर्व मुख्य बाजारपेठेत फिरुन सोमवारचा बंद यशस्वी करण्याचे आवाहन व्यावसायिकांना केले. दरम्यान, विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात फिरुन भारत बंदचे आवाहन केले. हा बंद यशस्वी करण्याचा निर्धार शनिवारी काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत सर्व पक्ष आणि संघटना पदाधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात आला. सोमवारी दुपारी १२ वाजता काँग्रेस कार्यालयात जमून व्यावसायिकांना बंदचे आवाहन करण्यात येणार आहे. हा बंद यशस्वी ठरण्यासाठी सर्व संघटना आणि पदाधिकारी रविवारपासूनच सक्रिय झाल्याचे दिसून आले.
सातपूरला आवाहन फेरी
मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देशबुडव्या धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने सोमवारी (दि. २७) पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी व्हावे म्हणून सातपूरला आवाहन फेरी काढण्यात आली. यावेळी केंद्रीय कामगार संघटना व शेतमजूर, महिला, युवा, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य राजकीय पक्षांनी सक्रिय पाठिंबा दिल्याची माहिती सातपूरला आयोजित बैठकीचे सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी दिली. यावेळी धनंजय रहाणे, कैलास कडलग, नितीन निगळ, आशा भंदुरे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब जाधव, प्रवीण नागरे, गणेश निगळ, समाधान तिवडे, कपिल भावले, धनंजय खैरनार, विश्वनाथ निकम, विकास सोनवणे, मीनाक्षी गायकवाड, नवराज रामराजे, मोहन जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सातपूर गावात फेरी काढून सोमवारच्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
फोटो
२६ पीएचएसपी ६५
सोमवारी होणाऱ्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन दुकानदारांना नाशिक शहरात फेरी मारुन विविध राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
फोटो (२६ सातपूर बंद)
सोमवारच्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सिटूचे सीताराम ठोंबरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले.