नाशिक : लोकसभेत मंजूर झालेल्या तीन तलाक विधेयक नामंजूर करुन राज्यसभेत ठेवू नये, या प्रमुख मागणीसाठी शहरातील शरीयत बचाव कृती समितीने मुस्लीम महिलांचा महा मूक मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी पत्रकान्वये शुक्रवारच्या नमाजदरम्यान मशिदींमधून याबाबत अधिकृतरित्या जाहीर केले.तीन तलाक विधेयक हे शरियतविरुध्द असून सरकारने मुस्लीम शरीयतमध्ये हस्तक्षेप याद्वारे करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या विधेयकाला देशभरातून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लीम समुदायाने एकत्र येत शरीयत बचाव कृती समिती खतीब यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केली.
या समितीच्या वतीने येत्या ३१ मार्च रोजी शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा महा मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाद्वारे तीन तलाक विधेयकाला विरोद दर्शविला जाणार असून हे विधेयक सरकारने नामंजूर करुन राज्यसभेपुढे मांडू नये, अशा मागणीचे निवेदन महिलांचे शिष्टमंडळ जिल्हाधिका-यांना देणार असल्याचे खतीब यांनी विविध मशिदींमध्ये पाठविलेल्या जाहीर पत्रकातून म्हटले आहे. मालेगावमध्ये काही दिवसांपुर्वी महिलांचा मूक मोर्चा या मागणीसाठी काढण्यात आला होता. त्यापाठोपाठ नाशिक शहरातही मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.