त्र्यंबकेश्वर : इगतपुरीच्या कॉँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी हाती शिवबंधन बांधले असले तरी, त्यांच्याविरोधात तीन माजी आमदार, सहा आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पाच आजी-माजी सभापती यांच्यासह कार्यकर्ते एकवटले असून, त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या बैठकीत ‘गावित हटाव-भूमिपुत्र हवा’ असा नारा देण्यात आला. याचवेळी गावितांनी कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी केली तरी त्यांच्याविरोधात दोन्ही तालुक्यातून एकच सर्वपक्षीय उमेदवार देण्याचा निर्णयही घेण्यात आला.निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेतील इच्छुकांसह शिवसैनिकांकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध होत असून, शिवसेनेचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह माजी आमदार माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार पांडुरंग गांगड, माजी सभापती गोपाळ लहांगे, ज्येष्ठ नेते मधुकर लांडे, अरु ण मेढे, हरिभाऊ बोडके, जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, भाजप नेते भाऊराव डगळे, जिल्हा परिषद सदस्य हिरामन खोसकर, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, संतोष डगळे, भाऊराव डगळे,माजी सभापती मोतीराम दिवे, माजी सभापती पांडुरंग झोले आदींच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे बैठकीत गावित हटाव मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी आमदार मेंगाळ यांनी सांगितले, शिवसेनेने मला उमेदवारीसाठी शब्द दिल्याने दोन वर्षांपासून तयारी करत आहे. गावित यांच्याविरोधात प्रचंड नाराजी असून, गत दहा वर्षांत मतदारसंघाने नंदुरबार येथील आयात उमेदवार सहन केला. आता स्थानिक भुमिपुत्रालाच उमेदवारी द्यावी असे सांगत गावित यांच्याविरोधात अन्य सर्व पक्षांतर्फे एकच उमेदवार देण्याचा निर्धार करण्यात आला. याचवेळी ‘गावित हटाव,आता भूमिपुत्र आमदार’ असा नाराही देण्यात आला. यावेळी हिरामण खोसकर, गोपाळ लहांगे, विनायक माळेकर, पांडुरंग गांगड, मधुकर लांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नगरसेवक सागर उजे, जेष्ठ नेते विष्णु आचारी, विष्णु खाडे, कमळु कडाळी, पुंडलिक साबळे, सरपंच राजू बदादे, शांताराम झोले, पांडुरंग आचारी, भाऊराव डगळे, लालु आचारी,काशीनाथ वारघडे, उपसभापती मधुकर झोले, मोहन भांगरे, माजी सभापती देवराम भस्मे, नगरसेवक बंडू खोडे, संतोष रौंदळे, हिरामण कवटे, जयराम मोंढे आदी उपस्थित होते. यावेळी विनायक माळेकर, हिरामण खोसकर, मधुकर लांडे, पांडुरंगबाबा गांगड, काशीनाथ मेंगाळ आदींनी मनोगत व्यक्त केले.मातोश्रीवर घालणार साकडेगावित यांना शिवसेनेने उमेदवारी देऊ नये, यासाठी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, माजी आमदार पांडुरंग गांगड, माजी आमदार शिवराम झोले यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, तालुक्यातील नेते येत्या४ सप्टेंबरला मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचाही यावेळी निर्णय घेण्यात आला. यावेळी गावित यांच्यासंबंधी असलेले भ्रष्टाचाराचे पुरावे, तसेच मतदारसंघातील समस्यांची माहिती ठाकरे यांच्यासमोर ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
निर्मला गावितांविरोधात विरोधक एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 1:48 AM