नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या २ तारखेपासून मोफत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेत जिल्हा परिषदेने राज्यात आघाडी घेतल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.राज्य शासनाने राज्यातील ११ जिल्ह्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे, त्यामध्ये नाशिक जिल्हा समाविष्ट असून, १०६ प्राथमिक आरोग्य केंद्र २३ ग्रामीण रुग्णालय पाच उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय नाशिक, मनपा नाशिक मालेगाव कार्यक्षेत्रातील रुग्णालय सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालये या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या तीस वर्षांवरील सर्व व्यक्तींची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांत ५४,४०४ स्त्रिया व ५६,००० पुरुष अशा एकूण १,१०,४०४ व्यक्तींची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे. या तपासणीत राज्यात नाशिक जिल्हा सर्वात अग्रेसर असून, अहमदनगर ४१,०३७, जळगाव ५३,३३२, धुळे ४४,२८८, नंदुरबार २१,७९७ अशा तपासण्या झाल्या आहेत सदरच्या तपासण्या करून ज्यांच्यामध्ये दोष आढळतील त्यांची पुढील सर्व तपासणी मोफत करण्यात येणार आहे.दि. २ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील तीस वर्षे वरील सर्व नागरिकांनी आपल्या सोयीप्रमाणे या मोहिमेदरम्यान जवळच्या शासकीय दवाखान्यात मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहनदेखील जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी केले आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, आरोग्य अधिकारी डॉ.गायकवाड, मनपा मालेगाव आरोग्य अधिकारी डॉ. डांगे तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, अतिरिक्त जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोहिमेसाठी परिश्रम घेत आहेत.
मौखिक आरोग्य तपासणीत नाशिक विभागात अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:22 AM