नाशिक - शहर व जिल्ह्यामध्ये मागील आठवड्या प्रमाणे आज आणि उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शनिवार (दि.१६) आणि रविवार (दि.१७) कुलाबा येथील वेधशाळेने नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
नाशिक जिल्ह्याला मागील महिनाभरापासून मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम होती. गेल्या शुक्रवारी (दि.८) शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणांची खालावलेली पाणीपातळीही वाढली आहे. जिल्ह्यात आता ९०टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा असून २३पैकी २१ धरणांची पाणी पातळी ९०टक्क्यापर्यंत पोहचली आहे. यामध्ये पाच धरणे तर शंभर टक्के भरली आहेत. शनिवार व रविवारी जोरदार पाऊस झाल्यास नाशिकची तहान भागू शकते आणि उर्वरित तालुक्यांत असलेली टंचाईची समस्याही दूर होऊ शकते.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील कळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, इगतपुरीसह निफाड, चांदवड, येवला या तालुक्यांमध्येही समाधान पाऊस झाला. हवामान खात्याने गेल्या शुक्रवारी ‘ऑरेंज’ तर शनिवारी ‘यलो’ अलर्ट दर्शविला होता. यानुसार पावसाने शुक्रवारी जोरदार ‘बॅटींग’ करत दमदार पुनरागमन केले होते. मात्र रविवारपासून पुन्हा दडी मारली. शहरासह जिल्ह्यात सर्वत्र कडक ऊन गेल्या पाच दिवसांपासून पडत होते. यामुळे पावसाने पुन्हा ओढ दिल्याचे बोलले जात होते. मात्र पुन्हा हवामान खात्याने नाशिकसाठी गुड न्यूज दिली आहे. शनिवार, रविवारी जोरदार पाऊस जिल्ह्यात होऊ शकतो.
शुक्रवारी 'यलो अलर्ट'हवामान खात्याने या शुक्रवारी (दि.१५) जिल्ह्याला 'यलो अलर्ट' अर्थातच मध्यम पावसाचा इशारा दर्शविला होता. यानुसार शहरात दुपारी तीन वाजेनंतर हलक्या सरींचा वर्षाव काही भागात झाला. तर काही भागात पावसाचे वातावरण तयार झालं होतं अन ढग दाटून आले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
बंगालच्या उपसागरात मागील 48 तासांत कमी दाबाचे तयार झालेले क्षेत्र ओडिशा, उत्तर आंध्र किनारपट्टी ओलांडून उत्तर-पश्चिमच्या दिशेने सरकले आहे. यामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे. परिणामी नाशिकलाही ऑरेंज अलर्ट दर्शविण्यात आला आहे.