पेठ : मागील आठवड्यापासून गुलाब वादळामुळे कोसळणाऱ्या पावसामुळे पेठ तालुक्यात भात शेतीसह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तत्काळ पंचनामे करून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी केली आहे.
गुरुवारी तहसीलदार संदीप भोसले यांना दिलेल्या निवेदनात मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या भात, नागली, वरई, तसेच टोमॅटो, भोपळा , कारले आदी भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कृषी, महसूल विभाग व पीक विमा कंपनीच्या वतीने तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वाघ, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भिका चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, मनसे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, अंबादास चौरे, भागवत पाटील, अंबादास सातपूते, रघुनाथ चौधरी, मनोहर चौधरी, पुंडलिक महाले, श्याम गावीत, नंदू गवळी, मोहन कामडी, प्रकाश भोये, सुरेश पवार, कैलास चौधरी, मोहन गावंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (३० पेठ नुकसान)