कळवण : दूषित पाण्यामुळेच वीरशेत येथे अतिसाराची लागण झाल्याचा शोध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते व पुणे येथील पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे उपसंचालक यांच्या सर्वेक्षण दौऱ्यात लावण्यात आला असून, गिते यांनी गटविकास अधिकारी बहिरम व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांना ग्रामसेवक व आरोग्यसेवकावर कारवाई करण्याचे आदेश दिले. कारवाई न झाल्यास गटविकास अधिकारी बहिरम यांना निलंबित करण्याचा इशारा डॉ. गिते यांनी दिल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.वीरशेत येथे बांधकामासाठी घेतलेल्या अनधिकृत नळ कनेक्शनमुळे बंद असलेल्या हातपंपाचे पाणी दूषित होऊन अतिसाराची लागण झाली. यात मंगला जाधव या महिलेचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी वीरशेत ग्रामपंचायतीस डॉ. नरेश गिते व पुणे येथील पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे उपसंचालकांनी भेट देऊन तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या व ग्रामसेवकाच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले. यंत्रणेला धारेवर धरु न दोन दिवसात कळवण तालुक्याचे स्वच्छतेचे सर्वेक्षण करून अहवाल मागितला आहे. दळवट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मल या ५ जुलैपासून विनापरवानगी गैरहजर असल्याने कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.घटनेची सर्व चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी शीतल सांगळे व डॉ. भारती पवार आदींनी केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी रजेवरून परतताच पाणी शुद्धीकरणाचा आढावा घेत सर्व संबधित यंत्रणांना जबाबदारीने काम करण्याचे तसेच जिल्ह्यातील सर्व पाणी स्रोतांच्या तपासणीचे आदेश दिले.
अतिसार प्रकरणी कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:53 AM