दोन दिवसांत मागविला अहवाल
नाशिक : जिल्हा परिषदेच्या गोवर्धन गटातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेच्या प्रसूतीवेळी अर्भक मृत्यूच्या घटनेची अध्यक्ष शीतल सांगळे यांनी गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांच्याकडून दोन दिवसांत अहवाल मागविला आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी दखल घेत दोनही वैद्यकीय अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दहेगाव येथील एक महिला प्रसूतीसाठी सोमवारी सकाळी दाखल झाली. यावेळी तिला थांबवून नंतर येण्यास सांगण्यात आले. दुपारी प्रसूतीच्या कळा असह्य झाल्याने ही गर्भवती महिला पुन्हा जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली. दरम्यानच्या काळात महिलेच्या पोटातच बाळ दगावले होते. जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त असून त्यात डॉ. प्रदीप जायभावे व डॉ. श्रीमती सातपुते यांचा समावेश आहे. दोन्ही वैद्यकीय अधिकारी सायंकाळी नसल्याने उपस्थित आरोग्य सहाय्यिकेनेच या महिलेची प्रसूती केली. त्यात महिलेच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांनी वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्यानेच गर्भवती महिलेच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत वैद्यकीय अधिकाºयांवर कारवाईची मागणी केली. या गंभीर घटनेची माहिती मिळताच बुधवारी (दि. २०) जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांना पाचारण करून त्यांची कानउघडणी केली. तसेच मुख्यालयी किती वैद्यकीय अधिकारी थांबतात, किती थांबत नाही, याची अचानक भेटी देऊन तपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच या घटनेचा दोन दिवसांत अहवाल सादर करून कोणी दोषी आढळले तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. यातील एक वैद्यकीय अधिकारी राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी संघटनेचा पदाधिकारी असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा होत आहे. बालमृत्यू सुरूचजिल्हा शासकीय रुग्णालयात १८७ बालमृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची दुरवस्था व त्यातून होणारे बालमृत्यू या निमित्ताने समोर आले आहेत.