पाणीटंचाई : माणिकपुंज धरणाची प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी
नांदगाव : न भूतो.. अशा मोठ्या दुष्काळाला नजीकच्या काळात सामोरे जावे लागण्याची स्थिती असून, पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. माणिकपुंज धरणातले पाणी बिनदिक्कत शेतीसाठी उपसले जात आहे. हे तत्काळ रोखले नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वेने पाणी आणावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने धरणात असलेले पंप तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी दिले आहेत.नांदगाव तालुक्यात यंदा नद्या-नाले कोरडेच राहिले. तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले गिरणा धरण मर्यादित गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहे. माणिकपुंज धरण जेमतेम ७० टक्केच भरले आहे. नाग्यासाक्या धरणाच्या गढूळ असलेल्या मृत पाणीसाठ्यातून ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुढचा पाऊस येईपर्यंत माणिकपुंज या एकमेव धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.प्रशासकीय पातळीवर या बाबींची दखल घेऊन, माणिकपुंज धरणाला प्रांत भीमराज दराडे, तहसीलदार भारती सागरे व गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांनी गुरुवारी भेट देऊन धरणात असलेले विजेचे शेतीपंप बंद करण्याच्या सूचना दिल्या; मात्र त्यावर शेतकºयांचा आम्ही पंप बंद करू; परंतु नदीतून पाणी सोडले जाणार असेल तर ते सहन करणार नाही, असा सूर उमटल्याने, माणिकपुंजचे पाणी हा वादाचा विषय होऊ नये. त्याकडे तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा साठा म्हणून बघावे, अशी सामंजस्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.तालुक्यात पृष्ठभागावरचे पाणी स्रोत आटले आहेत. विहिरींनी आॅक्टोबर महिन्यातच तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. पृष्ठभागावर पाणी असलेला व भौगोलिकदृष्ट्या सोयीचा असलेला एकमेव स्रोत माणिकपुंज आहे. तालुक्यात जूनमध्ये पाऊस पडतोच असे नाही. नाग्यासाक्या धरणाच्या पाण्याने दगा दिला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. गिरणा धरणाचे पाणी अल्पावधीत सगळीकडे उपलब्ध करून देणे कठीण आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, असाच सूर आहे.नाग्यासाक्या धरणात मृत पाणीच शिल्लक आहे. कासारीच्या दोन धरणात पाणी आहे. याशिवाय तालुक्यात इतरत्र पाणीसाठे नाहीत. माणिकपुंज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा करू नये. तसेच चोरून वीज घेणाºयांवर कडक कारवाई करावी.- भीमराज दराडे, प्रांताधिकारी