लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्याकरता मार्च महिन्यातील पहिल्या सप्ताहात निवडणूक कार्यक्र म जाहीर करावा व नवीन संचालक मंडळाने पदभार स्वीकारेपर्यत विद्यमान संचालक मंडळाने कामकाज पाहावे, असे आदेश मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नरेश पाटील व न्यायाधीश ए. ए. सय्यद यांनी दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशाने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटळ झाली असून, इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ३ नोव्हेंबर २०१५ रोजी संपली आहे. पावसाळी कारणाने लासलगाव बाजार समितीची निवडणूक शासनाने आदेश काढून पुढे ढकलली होती. त्यानंतर भाजपा-शिवसेना सरकारने माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्यासह अन्य प्रशासकीय मंडळाची घोषणा करण्याबाबत नाशिक येथील जिल्हा उपनिबंधकांना पत्र देण्यात आले होते. परंतु याबाबत मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक घेण्याबाबतची याचिका प्रलंबित असल्याने व जुने संचालक मंडळ कायम ठेवण्यात यावे अशी एक याचिका असल्याने प्रशासकीय मंडळ न नेमता जुन्या संचालक मंडळाने धोरणात्मक निर्णय न घेता कामकाज पाहावे असे आदेश उच्च न्यायालयाने सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी घेऊन दिलेले होते. मागील काही तारखांचे कामकाज झाल्यानंतर मंगळवारी उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.बाजार समितीची निवडणूक घेण्यासंदर्भात शेतकरी प्रतिनिधी निमगाव वाकडा येथील रंगनाथ गायकर व वेळापूर येथील नारायण पालवे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत शासनाचे सचिव, जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकारी व बाजार समिती यांना प्रतिवादी करण्यात आले होते. त्यानुसार विद्यमान सदस्य मंडळाची मुदत संपल्याने निवडणुका घेण्यात याव्या तोपर्यंत प्रशासक अथवा प्रशासक मंडळाची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)
लासलगाव बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश
By admin | Published: February 10, 2016 10:52 PM