नाशिक : वाडीवऱ्हे येथील ‘मोनियार रोफिंग’च्या ३४ कामगारांना येत्या पंधरा दिवसांत हमीपत्र घेऊन कामावर घेण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले आहेत. गेल्या आॅक्टोबर महिन्यात मोनियार रोफिंगच्या कामगारांनी एकत्र येत सीटू युनियनचे सदस्यत्व पत्करून कंपनीच्या प्रवेशद्वारावर झेंडा लावल्याची बाब कंपनी व्यवस्थापनाने गांभीर्याने घेत, झेंडा लावण्यासाठी प्रवेशद्वारावर जमलेल्या सात कर्मचाऱ्यांना निलंबित केले, तर किमान वेतनाची मागणी करणाऱ्या १४ कंत्राटी कामगारांनाही कामावरून काढून टाकले. त्यानंतर मात्र सर्वच्या सर्व ३४ कामगारांना कामावर कमी करून नवीन कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती केली होती. कंपनी व्यवस्थापनाच्या या कृतीविरुद्ध कामगार आयुक्त कार्यालयात तक्रारी केल्या असता, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी न करणे तसेच किरकोळ कारणावरून कामगारांना थेट कामावरून कमी करण्याच्या बाबीवरून कामगार आयुक्त कार्यालयाने कंपनीच्या विरोधात कारवाईही केली, परंतु कामगारांना कामावर घेतले जात नव्हते. यासंदर्भात कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)
कामगारांना कामावर घेण्याचे आदेश‘
By admin | Published: September 02, 2016 12:18 AM