नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील काथुर्वांगण नगरपालिका हद्दीतील अतिदुर्गम भागात असलेल्या आवळखेड येथील विविध समस्या जाणून घेण्यासाठी इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी यांच्यासह सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी भेट देत येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करीत विविध समस्या जाणून घेत पाणीपुरवठा योजना तातडीने मंजूर करण्याचे आदेश दिले आहे.आवळखेड येथे अजूनही शाळा, रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत तसेच अति महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी अनेक वर्षांपासून येथील नागरिक करीत आहेत. या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असून या गावातील महिलांना दीड किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमनाथ जोशी यांनी तत्काळ या ठिकाणी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात येऊन येथील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यात यावा असे आदेश यावेळी देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आवळखेड येथील एका वाडीवर आजपर्यंत रस्ता झाला नसून याठिकाणी रस्ता तयार करण्याची सूचना जोशी यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे इगतपुरी नगरपालिकेपासून अर्धा किलोमीटर अंतर असलेले आवळखेड गाव अजूनही मुख्य रस्त्याला जोडलेले नाही. तसेच या गावातील मुलांच्या शिक्षणासाठी वर्गखोल्या नसून त्या तातडीने बांधण्यात येऊन येथील मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली आहे.याप्रसंगी पाणीपुरवठा अधिकारी सूर्यवंशी, ग्रामसेवक रावसाहेब, बांधकाम विभागाचे शेख, पंचायत समितीचे सदस्य तसेच शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भगवान आडोळे, शरद बांबळे, नितीन उंबरे आदींसह वनविभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या आवळखेड येथे भेट दिली असता तेथील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. या ठिकाणी महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी असलेली पायपीट थांबविण्यासाठी तत्काळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले.- सोमनाथ जोशी, सभापती, इगतपुरी पंचायत समितीआवळखेड येथे भेट देत विविध समस्या जाणून घेतांना इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी. समवेत सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे व इतर ग्रामस्थ. (१५ नांदूरवैद्य ३)