नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या जिल्हा रुग्णालय सहकारी कर्मचारी पतसंस्थेचे कार्यालय अनधिकृत असल्याच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत़जिल्हा रुग्णालय सहकारी कर्मचाºयांची पतसंस्था गेली ३० वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र या पतसंस्थेचे कार्यालय हे रुग्णालयाच्या शासकीय इमारतीत आहे. हे कार्यालय बेकायदेशीर असल्याची तक्रार एका कर्मचाºयाने जिल्हा शल्यचिकित्सकांना तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी या कार्यालयाला जागा देण्याचे मान्य केले होते. मात्र प्रत्यक्ष जागा दिली नव्हती. परंतु संस्थेच्या पदाधिकाºयांनी जिल्हा रुग्णालय कार्यालयातच पतसंस्थेचे कार्यालय सुरू केले. ते आजपर्यंत बेकायदेशीरपणे सुरू आहे. या पतसंस्थेकडून रुग्णालयास कसलेही भाडे अगर काहीही उत्पन्न मिळत नाही. उलट या कार्यालयासाठी वीज, पाणी यांसह विविध सुविधा फुकट दिल्या जात आहेत. शासकीय नियमानुसार कोणत्याही खासगी आस्थापनांचे कार्यालय शासकीय जागेत तसेच शासकीय इमारतीत सुरू करता येत नाही. परंतु या पतसंस्थेचे कार्यालय शासकीय इमारतीत कार्यरत आहे. याबाबत कुठलेही अधिकृत कागदपत्र पतसंस्थेकडे नाहीत.मार्च २००८ च्या शासन निर्णयनुसार कोणत्याही व्यक्ती, संस्था, सहकारी संस्था, संघटना यांचे कार्यालयासाठी व व्यवसायासाठी शासकीय जागेचा वापर करता येणार नाही. या निकषात पतसंस्था असल्याने मागील ३० वर्षांचे भाडे पतसंस्थेच्या संचालकांकडून वसूल करण्यात यावे तसेच जिल्हा रुग्णालय प्रशासनाने यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी कर्मचारी उज्ज्वला कराड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.जिल्हा रुग्णालय सहकारी कर्मचारी पतसंस्था कार्यालय अनधिकृतपणे जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत असल्याची तक्रार आपणास मिळाली आहे. त्यानुसार या सर्व प्रकाराची कडक चौकशी करून योग्य ती कारवाईचे करण्याचे आदेश आपण रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार चौकशी सुरू आहे. - डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक
पतसंस्थेच्या कार्यालयाबाबत चौकशी करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:46 AM