नाशिक : मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूच्या गाड्या पळवून नेण्यामागे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हात आहे काय याची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या संदर्भात अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना तसे पत्रही देण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मालेगाव तालुक्यात अवैध व बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणारे दहा मालट्रक अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी देवळा तहसीलदारांच्या सोबतीने पकडले होते. सदर ट्रकचे पंचनामे करून ते मालेगाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले होते. मात्र रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी दहा ट्रक पळवून नेल्याची बाब उघडकीस आली होती. या प्रकरणात मालेगाव तहसील कार्यालयाची भूमिका संशयास्पद असल्याचा निष्कर्षही काढण्यात येऊन पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली. तथापि, तहसील कार्यालयातून वाळूने भरलेले ट्रक पळवून नेण्याची मजल गेलेल्या वाळू माफियांशी महसूल खात्याच्या काही अधिकारी, कर्मचाºयांच्या संंबंधाचा संशय त्यातून घेण्यात येत होता. या सर्व पार्श्वभूमीवर वाळू गाड्या पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असला तरी, यात महसूल खात्याचा कितपत सहभाग आहे हे तपासून पाहण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. यात तसा प्रकार आढळल्यास थेट पोलिसात संबंधित अधिकारी व कर्मचाºयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही मालेगावचे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना देण्यात आल्या आहेत.पावत्या बनावटचवाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाºया वाळू माफियांकडून जप्त करण्यात आलेल्या वाळू वाहतूक परवान्याची तांत्रिक तपासणी पूर्ण झाली असून, त्या सर्व पावत्या बनावट असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. अमळनेर तालुक्यातील कोपरखेडा येथील ती वाळू असून, तापी नदीतील या वाळू ठिय्याचा काही भागांतील लिलाव नाशिकमधील एका ठेकेदाराने घेतला आहे. लवकरच त्यावर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
वाळूगाड्या प्रकरणी चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:40 AM