नाराजी : विनापरवानगी बोलल्याबद्दल शिक्षक निलंबित
नाशिक : मालेगाव येथील आढावा बैठकीत विनापरवानगी बोलल्याची शिक्षा एका प्रामाणिक शिक्षकाला चक्क निलंबनाची मिळाली आहे. राज्यमंत्री दादा भुसे यांच्या समक्षच हा प्रकार घडल्यानंतर आणि वस्तुस्थितीची जाणीव झाल्यानंतर भुसे यांनी संबंधित शिक्षकाचे निलंबन करू नये, असे दिलेले आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी बासनात गुंडाळत ठेवत शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली.मागील आठवड्यात शुक्रवारी मालेगाव पंचायत समितीत जिल्हा परिषदेच्या योजनांची आढावा बैठक ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, शिक्षण सभापती यतिन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या उपस्थितीत बोलविण्यात आली होती. या बैठकीनंतर तीन ग्रामसेवकांसह एका शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यात निलंबित करण्यात आलेल्या तीन ग्रामसेवकांपैकी एक महिला ग्रामसेवक आहे. या महिला ग्रामसेविकेला वैयक्तिक लाभातून उभारण्यात आलेले शौचालयाचे दरवाजे चोरीला गेले म्हणून निलंबित करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे या ग्रामसेविकेने बैठकीनंतर पदरमोड करून चोरीस गेलेल्या शौचालयाचे दरवाजे बसविले होते. ज्या लाभार्थींच्या शौचालयाचे दरवाजे चोरीला गेले, ते लाभार्थी ऊसतोड कामगार असल्याने आठ आठ महिने घरी नसल्यानेच ही चोरी झाल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. याच आढावा बैठकीत महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यांनी अनुसूचित जाती/जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाची रक्कम मिळण्यासाठी बॅँकेत खाते उघडण्याची अडचण येत असल्याचे सांगितले. त्यावर उपस्थित एका पदाधिकाºयाने शिक्षक आणि मुख्याध्यापक गणवेशाच्या पैशाचे काय करतात, हे आम्हाला माहिती आहे, असे सुनावले. तसेच दीपककुमार मीणा यांनी तर संतप्त होत बैठकीतच या शिक्षकाची खरडपट्टी काढल्याचे समजते. पृथ्वीराज शिरसाट हे कीर्तनकार शिक्षक असून, गावोगावी कीर्तन करून जमा झालेल्या पैशातून त्यांनी त्यांची जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याबराबेरच आठ लाखांची संरक्षक भिंतही बांधली आहे. बैठकीत शिक्षक पैशाचे काय करतात, या पदाधिकाºयाच्या टिप्पणीवरच त्यांनी सर्व शिक्षक तसे नसतात, असे सांगितल्यानेच पदाधिकारी व सीईओंच्या रोषाला त्यांना बळी पडावे लागल्याची चर्चा आहे.