नाशिक : सरकारी योजनेसाठी कागदपत्रे महत्त्वाची असली तरीही, आधी रुग्णावरील उपचाराला प्राधान्य द्या. कागदपत्रांमुळे कुणी गरजू, गरीब रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन धर्मादाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांनी केले.
पंचवटीतील श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात धर्मादाय रुग्णालय योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर सहायक धर्मादाय आयुक्त कृष्णा सोनवणे, मविप्र संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, तुलसी आय हॉस्पिटलचे सीईओ डी. के. झरेकर, श्री सप्तशृंगी हॉस्पिटलच्या विश्वस्त हिमगौरी आडके आदींसह शहरातील विविध धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनाकाळात खासगी, सरकारी, निमसरकारी रुग्णालयांबरोबरच धर्मादाय हॉस्पिटल्सनेदेखील उल्लेखनीय कार्य केले आहे, असे सांगतानाच झपाटे यांनी विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले. रुग्णालयांना येणाऱ्या समस्या, त्यांचे प्रश्न वेळीच सोडवण्यासाठी संघटना गठित करण्याचे आवाहन केले. उत्पन्नाचा दाखला नसेल तर लगेच उपचाराला नकार देऊ नका. ठरावीक मुदतीत कागदपत्रे दिली नाहीत तर आमच्या कार्यालयाला कळवा, असे धर्मादाय सहआयुक्तांनी नमूद केले. मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या नाशिक जिल्हा आरोग्य देखरेख समितीवर धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी म्हणून नामको चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव शशिकांत पारख यांची निवड झाल्याचे धर्मादाय सहआयुक्त झपाटे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिमगौरी आडके यांनी केले. नामको ट्रस्टचे सचिव शशिकांत पारख यांनी आभार मानले.
इन्फो
माहिती दर्शनी भागात लावा
सहायक धर्मादाय आयुक्त के. एम. सोनवणे यांनी सरकारी योजनांची माहिती देतानाच रुग्णालयांना लागू असलेल्या नियमांसंदर्भात मार्गदर्शन केले. राखीव बेड्स, उपलब्ध योजना, याबाबतची माहिती दर्शनी भागात लावा. रुग्णाला आवश्यक ती पुरेशी माहिती देत अखंड रुग्णसेवेचा वसा कायम ठेवा, असे आवाहन केले.