सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरण पाणलोट क्षेत्रातील दारणा व गंगापूर धरण पूर्ण भरले असून, पावसाचा जोर वाढल्यास गोदावरी नदीला केव्हाही पूरस्थिती निर्माण होऊ शकते. पूर आला की पुलाला अडकलेल्या पानवेली पाणी वाहण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पूरपाणी आजूबाजूला असलेल्या शेतात घुसते. त्यामुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना पुराचा फटका बसतो. त्यामुळे सायखेडा व करंजगाव येथील गोदावरी नदीच्या पुलाला अडकलेली पानवेली तत्काळ काढण्याचे आदेश आमदार दिलीप बनकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. दोन्ही पुलांची आमदार बनकर यांनी पाहणी केली. यावेळी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपअभियंता निकम व दिघे, शाखा अभियंता नागरे उपस्थित होते. हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली जाते आणि त्याचा फटका शेतीला बसतो. येणाºया काळात पाऊस वाढला तर पुराची शक्यता नाकारता येत नाही आणि पुलाला अडकलेल्या पनवेलीचा फटका पुलाला बसतो. धोका टाळण्यासाठी अडथळा ठरणाºया पानवेली तत्काळ काढण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.गोदावरी व दारणा नदीवर असलेली सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, नाशिकच्या पश्चिम भागात काही तास असाच पाऊस पडत राहिला तर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल आणि या पाण्याचा फटका सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चाटोरी चापडगाव या गावांना सर्वाधिक बसतो.
सायखेडा येथील पानवेली काढण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:11 PM