दोन वर्षांपूर्वी शासनाने राज्यातील अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅक ॲपवर दररोजची माहिती भरण्यासाठी मोबाईलचे वाटप केले होते. परंतु, काही दिवसांतच हे मोबाईल नादुरुस्त होऊ लागले असून, त्याचा खर्च मात्र अंगणवाडी सेविकांना सोसावा लागत आहे. शासनाने दिलेल्या मोबाईलची क्षमता अतिशय कमी असल्याने त्यात शासनाचे ॲप डाऊनलोड होत नसल्याची अंगणवाडी सेविकांची तक्रार आहे. त्याचाच भाग म्हणून राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने राज्यभर मोबाईल वापसी आंदोलन राबवून प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मोबाईल जमा केले आहेत. त्यामुळे दररोज शासनाकडे ऑनलाईन माहिती भरणे बंद झाले आहे. शासनाने सदरचे मोबाईल बदलून द्यावेत, अशी अंगणवाडी सेविकांची मागणी आहे. या संदर्भात एकात्मक सेवा योजना कार्यालयाने संबंधित मोबाईल कंपनीशी संपर्क साधून सदरचे मोबाईल दुरुस्त करून द्यावेत, अशा सूचना केल्याने कंपनीनेही त्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी आता त्या कंपनीशी संपर्क साधून ३० ऑगस्टअखेर नादुरुस्त असलेले मोबाईल दुरुस्त करून घ्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
एकात्मिक सेवा योजना कार्यालयाच्या या आदेशाने अंगणवाडी सेविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, सदर कंपनीचे मोबाईल हे निकृष्ट दर्जाचे असून, ते दुरुस्तीसाठी मान्यताप्राप्त सर्व्हिस सेंटर नसल्याने आजवर दुरुस्तीसाठी अंगणवाडी सेविकांनी हजारो रुपये खर्च केले आहेत. आता पुन्हा त्याच मोबाईलची दुरुस्ती करून वापरणे अशक्य असल्याचे अंगणवाडी सेविकांचे म्हणणे असून, एकात्मिक बाल सेवा आयुक्तालयाने मोबाईल परत घेण्याबाबत काढलेले परिपत्र मागे घ्यावे, या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.