नाशिक : शहरात अशा अनेक खासगी खुल्या जागा आहेत की त्याठिकाणी अस्वच्छतेने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. जागामालक कोण, याबाबत तपास लागत नसल्याने तक्रार तरी कोणाविरुद्ध करायची, असा प्रश्न रहिवाशांना सतावत असतो. आता खासगी खुल्या जागांवर अस्वच्छता अथवा झाडा-झुडपांचे जंगल आढळून आल्यास संबंधित जागामालकांवर कठोर कारवाईचे आदेश पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. प्रसंगी याबाबत नियमावली तयार करण्याची सूचनाही आयुक्तांनी आरोग्य विभागाला केली आहे. शहरात सध्या डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असताना खासगी खुल्या जागांवर होणाऱ्या अस्वच्छतेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी डेंग्यूविषयक झालेल्या महासभेत सदस्यांनी या खुल्या खासगी जागांवर होणाऱ्या अस्वच्छतेकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरात अनेक प्लॉट मोकळे आहेत. या प्लॉटभोवती तारांचे अथवा संरक्षक भिंतीचे कुंपण बांधलेले असते. परंतु हे मोकळे प्लॉट अस्वच्छतेची केंद्रे बनली आहेत. शहरात बरेचसे प्लॉट्स हे नाशिकबाहेरील नागरिकांनी गुंतवणूक म्हणून घेऊन ठेवले आहेत. परंतु हे प्लॉट्स विकसित न करता वर्षानुवर्षे पडित म्हणून ठेवल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत, झाडे-झुडपे वाढलेली आहेत. शिवाय या प्लॉटवरच रहिवाशांकडून कचरा टाकला जातो. पावसाळ्यात पाण्याची डबकी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढते. शिवाय उंदीर-घुशींचाही वावर वाढतो. अनेक मिळकतधारकांचे नेमके पत्ते पालिकेकडे नसल्याने नोटिसा बजवायच्या कोणाला, हा प्रश्नही पालिका प्रशासनाला पडत असतो. संबंधित जागामालकांना नोटिसा बजावूनही कार्यवाही होत नसल्याचीही उदाहरणे आहेत. त्या पार्श्वभूमीवर सदस्यांनी खुल्या जागांवरील अस्वच्छतेबाबत गांभीर्याने दखल घेत संबंधित जागामालकांवर कठोर कारवाईची मागणी उचलून धरली. (प्रतिनिधी)
खासगी खुल्या जागांवर अस्वच्छता कारवाईचे आदेश
By admin | Published: December 10, 2014 1:57 AM