श्याम बागुल, नाशिक : आदिवासी शेतकऱ्यांनी धानाची पेरणीही न केलेली असताना शहापूर तालुक्यातील खर्डी केंद्रांतर्गत पळशीन येथील आदिवासी विकास सोसायटीत बोगस धान खरेदी दाखवून शासनाची फसवणूक झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या घोटाळ्यास जबाबदार असलेल्या पाच जणांविरूद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदिवासी विकास महामंडळांकडून आदिवासी शेतकऱ्यांकडून दरवर्षी धान खरेदी केले जाते.
शहापूर तालुक्यातील पळशीन आदिवासी विकास साेसायटीमार्फत सन २०२१-२२ या वर्षासाठी धान खरेदीची मान्यता दिलेली असता, संस्थेने खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामात धान खरेदी केल्याचे दाखविल्याची तक्रार आदिवासी विकास महामंडळाकडे करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून या तक्रारींची चौकशी करण्यात येत होती. त्यात प्रामुख्याने सोसायटीने ज्या शेतकऱ्यांकडून धान खरेदी केले, त्यांचे सातबारा उतारे तपासणी केली असता, त्यांनी रब्बी हंगामात कोणतीही धान पेरणी केली नसल्याचे आढळून आले होते.
शिवाय सोसायटीला धानाची विक्रीही केली नसल्याचे चौकशीत जबाबात म्हटले होते. चौकशी अधिकाऱ्यांनी सुमारे १८ शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या नावे सोसायटीने बोगस धान खरेदी दाखविल्याचे लक्षात आले होते. याशिवाय पळशीन येथील सोसायटीतून शहापूर येथील लवलेनगर येथील दत्तकृपा राईस मिल येथे ज्या वाहनातून धानाची वाहतूक करण्यात आल्याची कागदपत्रे सादर करण्यात आली होती.