नाशिक (सुयोग जोशी) : नाशिक शहरात येत्या २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित महापालिकेच्या बैठकीत येत्या आठ दिवसात अधिकाऱ्यांना विभागनिहाय पुन्हा आराखडा सादर करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिले.
याबाबत महापालिकेत सोमवारी सकाळी आयुक्तांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. कुंभमेळ्यासाठी महापालिकेने जवळपास आठ हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. यात बांधकाम विभागाचा अडीच हजार कोटी, मलनिस्सारण विभागाचा ६२७ कोटी, तर घनकचरा विभाग, आरोग्य व वैद्यकीय विभाग, अग्निशमन विभाग, उद्यान व पाणीपुरवठा या विभागांचा जवळपास सव्वापाच हजार कोटी रूपयांचा आराखडा आहे. सदर आराखडा राज्य शासनाला सादर करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. या बैठकीला सर्व विभागप्रमुख उपस्थित हाेते.