नाशिक : अवयवदानाचे महत्त्व समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे व त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आरोग्य विद्यापीठ व नाशिक शहरातील संलग्नित महाविद्यालये यांच्यासंयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २९ रोजी सिटी सेंटर मॉल येथे अवयवदान विषयावर भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे. तसेच गणेश उत्सवादरम्यान स्वतंत्र नोंदणी कक्षाद्वारे जनप्रबोधन व शहरातील विविध मध्यवर्ती ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. गरजू रुग्णांसाठी अवयवदान हा आशेचा किरण आहे. विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनातर्फे या कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण सहभाग असणार आहे. सर्वसामान्यांमध्ये असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली. या अवयवदान विषयावर विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला, व्याख्यान, चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ ते ३१ आॅगस्टदरम्यान अवयवदानासाठी आवश्यक अर्ज शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागात मिळतील. अवयवदान जनजागृती अभियानासाठी नाशिकमधील एनडीएमव्हीपीएसचे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, आयुर्वेद सेवा संघाचे आयुर्वेद महाविद्यालय, मोतीवाला होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय, श्रीसप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, तसेच विद्यार्थी, विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक सहभागी होणार आहेत.सार्वजनिक गणेश उत्सवादरम्यान नामांकित गणपती मंडळाच्या ठिकाणी दि.५ सप्टेंबर ७ पर्यंत अवयव दानाविषयी जनजागृती होण्यासाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. या कक्षाद्वारे अवयवदानासंबंधी माहितीपत्रक व अवयवदानासाठी नोंदणी फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.नाशिक शहरातील मेनरोड येथील नाशिक महानगरपालिका गणेश मित्रमंडळांच्या ठिकाणी गोखले एज्युकेशन सोसायटी आॅफ नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, सोमवार पेठेत गुलालवाडी मित्रमंडळाच्या ठिकाणी आयुर्वेद सेवा संघाचे आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी, रविवार कारंजा येथे चांदीचा गणपती रविवार कारंजा मित्रमंडळाच्या ठिकाणी डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, रविवार पेठ येथे नाशिकचा राजा गणेश मित्रमंडळाच्या ठिकाणी महात्मा गांधी विद्यामंदिराचे के.बी.एच. दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी, भद्रकाली येथे साक्षी गणेश मित्रमंडळाच्या ठिकाणी श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी नोंदणी कक्षाद्वारे अवयवदानाविषयी माहिती देणार असल्याचे कुलसचिव डॉॅ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले.
अवयवदान जनजागृतीसाठी आरोग्य विद्यापीठातर्फे उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:07 AM