नाशिक : ज्ञानेश्वरी ग्रंथातील दिव्य, जीवनदर्शी विचार मुलांपर्यंत योग्य वयातच पोहचावे तसेच, यातून जीवनव्रती कार्यकर्ते घडावे, या हेतूने संत सेवा संघ आणि खडके फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘संतांच्या जीवनातील प्रसंग’ या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असून, रविवारी (दि.११ आॅक्टोबर) रमा माधव भवन, संत ज्ञानेश्वर संकुल, बापू बंगला, इंदिरानगर येथे पुरस्कार प्राप्त चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धेचे परीक्षण चित्रकारबंधू राजेश सावंत आणि प्रफुल्ल सावंत हे करणार आहेत.शाळा-महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य आचार- विचार घेऊनच बाहेर पडावे, तसेच विद्यार्थ्यांना योग्य वयातच संतविचारांच्या अभेद्य कवचाचे संरक्षण मिळावे, या हेतूने सी.डी.ओ. मेरी हायस्कूल, मविप्र इंजिनिअरिंग कॉलेज, कोठारी कन्या विद्यालय, सारडा कन्या विद्यालय, पेठे विद्यालय आदि शाळा, महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.ज्ञानेश्वरीच्या ७२५व्या जयंतीनिमित्त पसायदान ही वैश्विक प्रार्थना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने संत सेवा संघ संस्थापक संजय गुरुजी यांची पसायदानाचा अर्थ विशद करणाऱ्या प्रवचन मालेचे शुक्रवार (दि.२) ते गुरुवार (दि.८) आॅक्टोबर या कालावधीत संध्याकाळी ६.३० वाजता लक्षिका मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले असून, संत सेवा संघातर्फे घेण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)
ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त उपक्रमांचे आयोजन
By admin | Published: September 30, 2015 11:24 PM