लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याने महापालिका प्रभाग क्रमांक १३चे नगरसेवक फारुख खान फैजुल्ला खान यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेने एक हजार रुपये दंड वसूल केला आहे. या विवाह सोहळ्यात सामाजिक अंतराचा फज्जा उडाला तसेच सॅनिटायझरचा वापर दिसून आला नाही. विनामास्क मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या प्रकाराची महापालिका व पोलीस प्रशासनाने दखल घेत आयोजक नगरसेवक खान यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. शहर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असताना लोकप्रतिनिधींकडून वारंवार नियमांची पायमल्ली होत असल्याचे समोर येत आहे. यापूर्वीही माजी आमदार आसिफ शेख, माजी महापौर रशीद शेख यांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याच्या घटना घडल्या आहेत.