जुने नाशिकमधील मनपाचे डॉ. झाकीर हसेन हे रुग्णालय आहे. या रुग्णालयाला पूर्णपणे कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आला आहे. येथील ऑक्सिजनच्या मुख्य टाकीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त होऊन गळती सुरू झाली. यावेळी ऑक्सिजनचा टँकरदेखील आलेला होता. या टँकरमधून ऑक्सिजन टाकीमध्ये भरण्यात येणार होते. याच दरम्यान, व्हॉल्व्ह पूर्णत: निकामी होऊन मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती होऊ लागल्याने धावपळ उडाली. नवीन व्हॉल्व्ह बसविण्यापर्यंत जो काही कालावधी लागला त्या कालावधीदरम्यान ऑक्सिजन पुरवठाचा दाब हा रुग्णालयात पूर्णपणे कमी झालेला होता आणि यामुळे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर असलेले रुग्ण हे एका पाठोपाठ एक दगावण्यास सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या दुर्दैवी घटनेची संपूर्णपणे चौकशी केली जाईल आणि दोषी असणार्यांवर कारवाई करण्याचे आश्वासनही मांढरे यांनी दिले.
---
मनपा आयुक्त पाऊण तासाने घटनास्थळी
रुग्णालयात सव्वाबारा वाजेच्या सुमारास ऑक्सिजनच्या टाकीला गळती सुरू झाली आणि रुग्णालयाच्या नातेवाइकांच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती रुग्णालयाच्या आवारात धावू लागला. वैद्यकीय यंत्रणाही चक्रावून गेली. सर्वत्र मृत्यूचा तांडव अन् नातेवाइकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोशाने रुग्णालयाच्या भिंतीही हादरल्या. या भीषण दुर्घटनेच्या वेळी मनपा आयुक्त कैलास जाधव हे तब्बल पाऊण तासानंतर रुग्णालयात पोहोचले. पाऊण वाजेच्या सुमारास त्यांनी रुग्णालयाचा उंबरा चढला अन् बंदी घातली ती सर्वप्रथम वार्तांकन करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींवरच...!
----