नाशिक : वडाळागाव परिसरात चिकुनगुनियासदृश आजारासह विषमज्वर, विषाणूजन्य तापाची साथ पसरल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. येथील घरांची तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ४६ घरांमध्ये ‘एडीस’ डासाच्या उत्पत्तीला पूरक असे पाण्याचे साठे आढळून आले आहेत. वडाळागाव परिसरात मिश्र आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये ६५ रुग्णांना सांधेदुखीचा त्रास जाणवत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. रुग्णांमध्ये हिवतापाची लक्षणे दिसत नसली तरी चिकुनगुनिया संशयित रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. या भागात महापालिकेच्या आरोग्य व राज्य शासनाच्या शहर आरोग्य विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने घरांना भेटी देत पाण्याचे साठे तपासले जात आहे. तसेच डासप्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणीलाही प्रारंभ करण्यात आला आहे. दोन दिवसात ४६ नागरिकांच्या घरांमधील पाणीसाठ्यात एडीस डासाच्या अळ्या, कोष आढळून आल्याच्या नोंदी आरोग्य विभागाने घेतल्या आहेत. स्वच्छ पाणीसाठ्यामध्ये या डासाची उत्पत्ती होत असल्यामुळे पाण्याचे साठे उघडे न ठेवता ते दिवसाआड स्वच्छ करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. आरोग्य विभाग जरी जागा झाला असला तरी या विभागाला महापालिकेच्या अन्य विभागांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्याशिवाय साथीच्या आजारावर मात करणे शक्य होणार नाही. येथील मनपा शाळेच्या परिसरातील कोळीवाडा, माळी गल्ली, संजरी मार्ग, गोपालवाडी, गरीब नवाज कॉलनी, राजवाडा, रजा चौक, केबीएच विद्यालयाचा परिसर, जय मल्हार कॉलनी या भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. माळी गल्ली, बारा खोली, गरीब नवाज कॉलनी आदी परिसरातील पाण्याचे नमुने संकलित करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गुरुवार (दि. २१) दुपारपर्यंत नमुन्यांचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. दूषित पाण्यावाटे पसरणारे आजारांचे निदान अहवालातून स्पष्ट होईल.दूषित पाण्यावाटे आजारांचा फैलाववडाळागावातील प्रभावित भागात काही ठिकाणी पाण्याला पिवळसर रंग दिसत आहे. पिण्याचे पाणी गढूळ मातीमिश्रित असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच काही परिसरांमध्ये पाण्याला दुर्गंधीही जाणवत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. यामुळेदेखील पाण्यावाटे पसरणाºया आजाराचा फैलाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येथील परिसरात जुनाट जलवाहिन्या असून, जलवाहिन्या या भूमिगत गटारींच्या शेजारून टाकण्यात आलेल्या आहेत. गटारींमधील सांडपाणी जलवाहिन्यांची अंतर्गत गळतीमधून मिसळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
४६ घरांमध्ये ‘एडीस’ डासांची उत्पत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:42 AM