लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी वेब कॅमेऱ्याच्या माध्यमातून निवडणूक आयोग दिल्लीत बसून प्रत्येक मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्याची योजना आखत असताना नाशिक जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील सुमारे १५६ मतदान केंद्रावर दळणवळण व संपर्काची कोणतीही सोय नसल्याने अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्थेचा शोध घेण्याच्या सुचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. दूरध्वनी, वायरलेस सेटसह अन्य पर्यायही उपलब्ध नसतील मतदान केंद्रावर ‘रनर’ नेमण्याचा अंतीम उपाय त्यावर शोधण्यात आला असून, दर तासाने रनर मतदान केंद्रावरून माहिती घेवून पळतच ती संबंधितांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्याचे ठरविले असून, त्याचाच भाग म्हणून प्रत्येक मतदाराचे निवासस्थानाचे अक्षांश-रेक्षांश घेण्याबरोबरच, सर्वच मतदान केंद्रांचे डिजीटीलायझेशन करण्यात आले आहे. जेणे करून मतदान केंद्रावर निवडणूक आयोग दिल्लीत बसून निवडणूक गैरप्रकारावर लक्ष ठेवणार आहे. अर्थात त्यासाठी मतदान केंद्रावर वीज, भ्रमणध्वनीची रेंज, इंटरनेट सेवा आदी सुविधा असणे बंधनकारक आहे. देशातील प्रत्येक मतदान केंद्रांची या संदर्भातील माहिती आयोगाने मागितली असता, त्यात नाशिक जिल्ह्यातील १५६ मतदान केंद्रे ‘आऊट आॅफ रेंज’असून, गेल्या निवडणुकीत त्याची संख्या १७ च्या आसपास होती. ज्या मतदान केंद्रात सुविधा नसेल त्या मतदान केंद्रांवर पर्यायी व्यवस्था करण्याच्या सुचना आयोगाने दिल्या असून, त्यात प्रामुख्याने तात्पुरते मोबाईल टॉवर उभारणे, भ्रमणध्वनीच्या रेंजची सोय करणे, दूरध्वनी केंद्र अथवा मतदान केंद्राच्या नजिक दूरध्वनी असलेली पोलीस चौकी, ग्रामपंचायत कार्यालय एवढेच नव्हे तर खासगी व्यक्तीच्या दूरध्वनीची नोंद घेण्याच्या सुचना आहेत. या शिवाय सॅटेलाईन फोनचा काही वापर करता येईल काय या पर्यायाचाही विचार करण्याचे सुचविण्यात आले आहे. परंतु सॅटेलाईट व्यवस्था अव्यहार्य असल्याने त्यावर पर्याय म्हणून अतिदुर्गम भागात स्थानिक आदिवासी तरूणांची मदत घेवून ‘रनर’ नेमण्याचा विचार सुरू झाला आहे. मतदान केंद्रावर अशा रनर ची नेमणूक करून दर दोन तासांनी केंद्रावर होणा-या मतदानाची आकडेवारी आयोगाच्या अधिकाºयांना कळविण्याबरोबरच, मतदान केंद्रावर घडणाºया प्रत्येक बारिकसारिक घटनांची माहिती वरिष्ठ अधिकाºयांना कळविण्यासाठी या ‘रनर’ला पळविण्यात येणार आहे. मतदान केंद्राचे ठिकाण व मुख्यालय यातील अंतर अधिक असेल तर एका मतदान केंद्रासाठी एका पेक्षा अधिक रनर नेमण्यात येणार आहे.