राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारने दि.१ मे २०१७ रोजी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे.या मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना विविध सवलती आणि योजना जाहीर केल्या आहेत. रोख स्वरुपातही लाभ मिळू लागल्याने बांधकाम कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणी करून घेतली आहे. नाशिक विभागात एक लाख ८२ हजार १८५ बांधकाम कामगारांची नोंद झाली आहे. तर विविध योजनेअंतर्गत सुमारे ३ कोटी रुपयांचे वाटप लाभार्थींना करण्यात आले होते. बोगस नोंदणी होऊ नये म्हणून कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करण्याचा निर्णय कामगार उपायुक्त कार्यालयाने घेतला होता. मात्र, दरवर्षी या कामगारांनी ऑनलाईन नूतनीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे.
लॉकडाऊनच्या काळात उद्योग, व्यवसाय, रोजगार बंद झाले होते. या लॉकडाऊनचा परिणाम बांधकाम मजुरांवर झाला होता. बांधकामे ठप्प झाल्याने या कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. अशा परिस्थितीत या कामगारांना अर्थसहाय्य देण्याची मागणी जोर धरू लागली होती. म्हणून सरकारने बांधकाम मजूर कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून पाच हजार रुपयांची दोन टप्प्यात मदत दिली आहे. राज्यात संचारबंदीच्या काळात बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून या कामगारांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
------
चौकट ====
नोंदणी केलेल्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य,प्रोत्साहन भत्ता, महात्मा फुले जनआरोग्य योजना, गंभीर आजारासाठी एक लाखापर्यंत अर्थसहाय्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी अर्थसहाय्य, अपंगत्व आल्यास अर्थसहाय्य, अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य, सुरक्षा संच, व्यसन मुक्तीसाठी अर्थसहाय्य, कुटुंबनियोजन, प्रसुती सहाय्य, गृहकर्ज, विवाह अर्थसहाय्य, विमा योजना, वैद्यकीय सहाय्य, सामाजिक सुरक्षा यासह भरघोस अशा योजना आहेत.
चौकट====
बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्यासाठी वर्षभरात ९० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे बांधकाम ठेकेदाराचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, छायाचित्र, रहिवासी पुरावा, बँक पासबुक झेरॉक्स, नोंदणी फी फक्त २५ रुपये, वार्षिक वर्गणी एक रुपया याप्रमाणे पाच वर्षांसाठी ६० रुपये भरून कामगार उपायुक्त कार्यालयात रितसर नोंदणी करता येते.
● नाशिक जिल्ह्यात नोंदणीकृत एकूण बांधकाम कामगारांची संख्या ४९६२८
● पात्र कामगारांची एकूण संख्या १४२४०.
● विभागात (नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार ) एकूण नोंदणीकृत एकूण बांधकाम कामगारांची संख्या १८२१८५.
● विभागातील पात्र कामगारांची एकूण संख्या ६६२७८.
चौकट===
नोंदणी केलेल्या कामगारांनी दरवर्षी वर्षभरात ९० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे बांधकाम ठेकेदाराचे प्रमाणपत्र ऑनलाईन कामगार उपायुक्त कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. तरच तो कामगार लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरतो. बरेच कामगार नूतनीकरण करीत नाहीत. काहींचा मृत्यू झालेला असतो. तर काही परप्रांतीय कामगार गावी गेल्यावर परत येत नाहीत. काही स्थलांतरित होतात. अशा कामगारांची नोंद असते. परंतु ते लाभासाठी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे ही तफावत आढळते. जे लाभार्थी पात्र असतील त्यांची नावे मुंबईला मुख्यालयात पाठविण्यात आली आहेत. लाभार्थी कामगारांच्या बँक खात्यात परस्पर पैसे जमा केले जातात.
-गुलाबराव दाभाडे. कामगार उपायुक्त नाशिक
°●आमच्या पोटा-पाण्याचे काय ?
★ बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे रितसर नोंदणी केलेली आहे. परंतु नूतनीकरणाची प्रक्रिया माहीत नसल्याने आणि मला मार्गदर्शन न मिळाल्याने मी यापूर्वीच्या पाच हजार रुपये आणि आता दीड हजार रुपयांच्या मदतीपासून वंचित राहिलो आहे.
-बापू ठोके.
★ कामगार उपायुक्त कार्यालयात मी रजिस्ट्रेशन केलेले आहे. नूतनीकरणासाठी मी कार्यालयात चकरा मारल्या. त्यावेळी मनपाची निवडणूक सुरू होती. तसेच कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे २०१९ साली नूतनीकरण न झाल्याने मला लाभ मिळाला नाही. अधिकाऱ्यांमुळे मी लाभापासून वंचित राहिलो आहे.
-मारोती वडमारे.
★ बांधकाम कामगार म्हणून माझी नोंदणी झाली आहे. पुन्हा नूतनीकरण करावे लागेल हे कोणीही सांगितले नाही. त्यामुळे मी शासकीय लाभापासून वंचित राहिलो आहे. या अगोदरचे पाच हजार रुपये सुद्धा मिळाले नाहीत.
- विजय पाटील