सातपूर : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मार्चअखेर सातपूर विभागातून घरपट्टी, पाणीपट्टी आणि विविध करांची जवळपास १९ कोटी रु पयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. त्यात मागील दहा दिवसांत धडक मोहीम राबवून सुमारे अडीच कोटी रु पयांची वसुली केली आहे.विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी ठोस उपाययोजना आखून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक मिळकतधारकास देयके वेळेवर देण्याचा प्रयत्न केला आहे. वॉरंट, सूचना पत्र पाठविले. तसेच ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे. निरीक्षक आणि लिपिक यांना दररोजचे वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र काही बडे थकबाकीदार दाद देत नव्हते. म्हणून मिळकतींच्या दारावर थकबाकीची यादी चिकटवण्यात येत आहे. १४ हजार मिळकतधारकांना सूचना पत्र देण्यात आले होते. ४२ थकबाकीदारांकडे जवळपास २३ लाख रु पयांची थकबाकी असल्याने त्यांच्यावर जप्ती वारंट बजावण्यात आले होते. १२ हजार नळपट्टीधारकांना सूचना पत्र देण्यात आले असून, २५ थकबाकीदारांचे नळकनेक्शन बंद करण्यात आले होते. ७५ गाळेधारक थकबाकीदार असून, थकबाकी भरली नाही म्हणून गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली. विभागीय अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र थेटे, बबन घाटोळ, रामचंद्र सूर्यवंशी, विष्णू पगार, दादा बंदावणे, पोपट बंदावणे, मनोहर बेंडकुळे, संजय निगळ, प्रभाकर बंदावणे आदींसह कर्मचारी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्नशील आहेत.यावर्षी घरपट्टीपोटी १२ कोटी १८ लाख रु पयांची वसुली झाली आहे. तर पाणीपट्टीपोटी यावर्षी ४ कोटी ६२ लाख रु पयांची वसुली झाली आहे. तसेच विविध करांची वसुली सुमारे अडीच कोटी रु पये झाली आहे. एकूण सुमारे १९ कोटी रु पयांची वसुली करण्यात यश मिळविले आहे. तर विविध कारणांनी बंद असलेल्या ३० ते ३५ कारखान्यांकडे तब्बल ४ कोटी रु पयांच्या आसपास थकबाकी आहे. दरवर्षी या थकबाकीत वाढ होत आहे.महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी मार्चअखेर सातपूर विभागातून थकबाकी वसूल सुरू केली आहे. त्यामुळे मागील दहा दिवसांत धडक मोहीम राबविण्यात आली असून विविध करांचा भरणा करण्यासाठी महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात थकबाकीदारांची गर्दी झाली होती़ त्यामुळे रविवारी (दि़ ३१) रात्री ८ वाजेपर्यंत कार्यालय खुले ठेवण्यात आले होते़
सातपूर विभागातून विविध करांची १९ कोटींची थकबाकी वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 1:30 AM