येवला : तालुक्यातील अंगणगाव ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमिता, नियमबाह्य खर्च करणे आदींसह दहा गंभीर आरोप ठेवत गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांनी ग्रामसेवकावर निलंबनांची कारवाई केल्याने तालुक्यातील ग्रामसेवकांसह सरपंचाचे धाबे दणाणले आहे. येवला शहराची अनधिकृत हद्द आता अंगणगाव ओलांडून सुमारे दीड ते दोन किलोमीटर पुढे गेली आहे. येवला शहरकुसाला असलेल्या या गावात येवला औद्योगिक सहकारी वसाहतीसह पैठणी पर्यटन केंद्र, पैठणी क्लष्टर, पोलिस वसाहत, पालखेड पाटबंधारे डावा कालवा विभागाचे कार्यालय व वसाहत, आमदार छगन भुजबळ बोटींग क्लब, हॉटेल व्यवसाय, गोशाळा मैदान व दिवसागणिक वाढणारी बांधकामे यामुळे या ग्रामपंचायतीला मोठा महसूल मिळत आहे. मात्र या ग्रामपंचायतीचे कामकाज करताना अधिक लक्ष देण्याची गरज आहे. येथील ग्रामसेवक हिरामण जाधव यांच्यावर गटविकासाधिकारी आहिरे यांनी निलंबनाची कारवाई करत गंभीर आरोप ठेवले असून या आरोपांमुळे ग्रामपंचायत चर्चेत आली आहे. अंगणगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाढत्या अतिक्र मण बाबात कारवाई न करणे, ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणीसाठी न देणे, ग्रामपंचायतीचे दप्तर लेखा परिक्षणासाठी उपलब्ध न करणे, ग्रामपंचायतीमध्ये नियमबाह्य खर्च करणे, ग्रामसेवकाने अनिधकृतपणे गैरहजर राहणे, मुख्यालयी न राहणे, ग्रामपंचायतीचे दप्तरातील १ ते ३३ नमुने अद्ययावत न करणे, निर्वाचित गाव कारभाºयांच्या मासिक सभा तसेच ग्रामसभांचे इतिवृत्त वेळीच न लिहणे, लोक न्यायालया अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील वसुली न करणे, थकबाकीदारांना नोटीस न बजावणे, ग्रामपंचायत हद्दीतील प्लॉटधारक यादी न करणे, प्लॉटधारक कर आकारणी न करणे आदी गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. गटविकासाधिकारी आहिरे यांनी ग्रामसेवक जाधव व संबधितांना पाठविलेल्या या निलंबन आदेशात ग्रामसेवक जाधव यांच्या या गैरशिस्तीच्या व गैरवर्तणुकीमुळे नेमुन दिलेल्या कर्तव्यात अक्षम्य कसुर केल्याचे सकृत दर्शनी दिसून येते. म्हणजेच त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा नियम १९६४ चा कलम तीनचा भंग केल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध होते. यास्तव त्यांचे विरु द्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ नुसार शास्तीची कारवाई होणे क्र मप्राप्त आहे, असे नमुद केले आहे. या पत्रात गटविकासाधिकारी आहिरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांचे कडील दिनांक २६ मे २०१७ चे आदेशान्वये गटविकास अधिकारी पंचायत समिती येवला यांना असलेल्या अधिकारा नुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांचे किडल कार्योत्तर मंजुरीच्या अधिन राहुन अंगणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जाधव यांना आदेशाच्या दिनांकापासून कार्यालयीन वेळेनंतर जिल्हा परिषद नाशिकच्या सेवेतून निलंबित करीत असल्याचे आदेश दिले आहेत. ग्रामसेवक जाधव यांचे वरील आरोप पाहता व कामकाजातील कर्तव्यातील कसुर बाबतचे मुद्दे पाहता त्यांना निलंबित कालावधीत मुख्यालय देणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय व निर्वाह भत्ता या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांचे कार्यालयाकडून स्वतंत्र आदेश पारित केले जातील, असे नमुद केले आहे.
नियमबाह्य खर्च अंगलट, अंगणवाडी ग्रामसेवक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 3:47 PM