सिन्नर: तालुक्यातील गुळवंच येथे चिकनगुनिया सदृश्य आजाराने ग्रामस्थ त्रस्त आहेत. सांधेदुखी व तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून 27 जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत तर शंभर ग्रामस्थांवर औषध उपचार करण्यात आले आहेत.गावात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले. त्यातच संपूर्ण गावात सांधेदुखी व तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. याबाबत आरोग्य विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. पथकाने सर्वेक्षण सुरू करून कुटुंबनिहाय माहिती घेतली आहे. घरातील पाणी साठ्यांचीही पाहणी केली आहे.दोन दिवसात 27 जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. ज्या रुग्णांच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. शंभरहून अधिक ग्रामस्थांना औषधे वितरित करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाचे पथक पुन्हा सर्वेक्षण करणार असल्याची माहिती नायगाव उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मनिषा वाघ यांनी दिली.गुळवंचसह परिसरातील निमगाव-सिन्नर, बारागावपिंप्री येथेही कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे स्थानिक डॉक्टरांचे दवाखाने ही बंद आहेत. उपचारासाठी ग्रामस्थांना इतरत्र धावपळ करण्याची वेळ आली होती. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी गुळवंच येथे साथीचा आजार फैलावत असल्याची माहिती आरोग्य विभागाला दिली. गावात सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना केल्यानंतर लगेचच पथकाने सर्वेक्षण हाती घेतले.आठवड्यातील एक दिवस कोरडापिण्यासाठी प्लास्टिक ड्रम मध्ये केलेल्या पाणी साठ्यांची पाहणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली. दोन ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे प्रत्येक मंगळवार कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने ग्रामस्थांना केले. चिकनगुनिया सदृश्य आजारात घ्यावयाची काळजी, लक्षणे, स्वच्छता याबाबत माहिती देण्यात आली.