वडनेर : गेल्या आठवडाभरात कटवन परिसरातील सावतावाडी वडनेरला लाल कांद्याच्या रोपावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिसरात आठवड्यापासून रिमझिम पावसाचे सातत्य होते. यामुळे पावसाचे पाणी वाफ्यात साचल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मका बाजरी पिकाची लागवड केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी लाल कांदा लागवडीसाठी क्षेत्र राखून ठेवले आहे. काही ठिकाणी लाल कांद्याची लागवड झाली आहे तर काही ठिकाणी कांदा लागवड करण्यात येत आहे. परंतु पावसाचा अंदाज घेत उशिराने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी कांदा बियाणे उशिराने टाकले यातच महागडी कांदा बियाणे खरेदी करून टाकल्यानंतर सध्या मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे गणित पुन्हा बिघडणार आहे. सातत्याच्या पावसानंतर काही ठिकाणी विश्रांती घेतली असली तरी आठवडा भर रिमझिम पाऊस कांदा रोपाला घातक ठरला आहे. यामुळे कांदा रोपाची चांगले राहण्याची कोणतीही शाश्वती राहिली नसून महागडी बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी कांदा रोपाची वाफे खराब झाली आहेत. यामुळं लाल कांदा लागवडीचा प्रयत्न फोल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.