अजून सहा ते सात दिवस असेच वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. आधीच कांदा पिकावर मर, मावा व करपा रोगाने थैमान घेतले आहे, तर कांदा रोपांवर बुरशीजन्य रोगांनी अतिक्रमण केले आहे. त्यात पुन्हा वातावरणात बदल होऊन ढगाळ व रोगट हवामान निर्माण झाल्याने कांदा रोपे पूर्णतः खराब होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे कांदा रोपे खराब झाल्याने शेतकऱ्यांनी चार ते पाच हजार रुपये किलोचे बियाणे उपलब्ध करून लाल व उन्हाळ कांदा लागवडीसाठी रोपे तयार केली आहेत, मात्र वातावरणातील बदलामुळे कांदा लागवडीच्या आशा धूसर झाल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे गहू, हरभरा या पिकांनादेखील मावा व मर रोगाने घेरले आहे. हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येणार आहे. काही शेतकऱ्यांनी मका पिकाची कापणी केल्यानंतर हरभरा पेरणी केली होती. हे पीक आता फुलोऱ्यात आहे, तर काही पिकांना घाटे लागले असून, घाटेअळी वाढली आहे.वातावरणातील बदलाचा मोठा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. शेतातील मेथी, पालक, गिलके, वाल, दोडके या भाजीपाला पिकावर मावा तसेच घुबड्याने अतिक्रमण केल्याने संपूर्ण पिके खराब झाली आहेत. औषधांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ व रोगट हवामानामुळे द्राक्षबागांवर भुरी, डावणी या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने द्राक्ष पीक धोक्यात आले आहे. चार-पाच दिवसांपासून दिवसातून चार वेळेस औषधे तसेच बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.- पांडुरंग शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, तांदूळवाडी
द्राक्ष, गहू, हरभरा, कांद्यासह भाजीपाला पिकावर रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 7:10 PM
पाटोदा : परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होऊन ढगाळ व रोगट वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच दोन दिवस पहाटे अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. वातावरणातील बदलामुळे द्राक्ष,कांदा, कांदा रोपे, गहू, हरभरा व भाजीपाला पिकांवर चिकटा, मर, मावा तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी औषधांची फवारणी करण्यास प्रारंभ केला आहे. या बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसत आहे. भुरी, डावणी व घडकुजीचे प्रमाण वाढले असून, औषध फवारणीमुळे खर्चात वाढ झाली आहे.
ठळक मुद्देअवकाळीची हजेरी : ढगाळ, रोगट हवामानामुळे शेतकऱ्यांना धडकी