नाशिक : शहराच्या वेशीलगत असलेल्या गोवर्धन व चांदशी गावांच्या शिवारात काही हॉटेलमध्ये सर्रासपणे नियमांची ऐशीतैशी करत व्यवसाय केला जात होता, तर गोवर्धन शिवारात एका ठिकाणी हुक्क्याचा धूर निघत असल्याची कुणकुण तालुका पोलिसांना लागली. पोलिसांनी या भागात धाडसत्र राबवित गुन्हे दाखल करत काही संशयितांना अटकही केली.कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी जिल्ह्यातसुध्दा संचारबंदी, जमावबंदीचे आदेश लागू आहेत. तसेच हॉटेलचालकांनी विविध नियमांचे पालन करत खबरदारी घेत व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र याबाबत सर्रासपणे दुर्लक्ष करत चांदशी शिवारात हॉटेल व्यावसायिकांकडून व्यवसाय चालविला जात होता. तसेच गोवर्धन गावाच्या शिवारात असलेल्या हॉटेल डायोनिजमध्ये तर चक्क हुक्क्याचा धूर उडविला जात असल्याने त्याची ‘दुर्गंधी’ थेट पोलिसांपर्यंत पोहचली आणि तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक शिवाजी जाधव यांच्या पथकाने थेट कारवाई केली. जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हॉटेल चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या हॉटेलमधून हुक्का तंबाखू, हुक्का ओढण्याचे साहित्य असा सुमारे ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी संशयित कुशलकुमार धिवरे, अमेय तीळगुळकर यांना ताब्यात घेतले. तसेच चांदशी शिवारातील काही हॉटेल्सचालकांनी नियम धाब्यावर बसविल्याने त्यांच्यावरही राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.---इन्फो---शासकिय नियमांचा भंग हॉटेलमालकांना भोवलाचांदशी शिवारातील हॉटेलमध्ये थेट टेबल-खुर्च्यांवर ‘पाहूणचार’ कुठलीही खबरदारी न घेता दिला जात होता. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम-अटींचे पालनही होत नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी हॉटेलमालक शिवराज वावरेविरूध्द गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे रानमळा भागातील एका हॉटेलचे मालक संजय सुगंधी यांच्यावरही नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला गेला. चांदशीमधील एका हॉटेलचे मालक जितेंद्र उपाध्याय यांच्याकडूनही नियमांचा भंग झाल्याने कारवाई करण्यात आली.
गोवर्धन, चांदशी गावांत हुक्का पार्लर, हॉटेलवर पोलिसांची छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 4:00 PM
गंगापूर धरण परिसर, दुगाव, गिरणारे, काश्यपी धरण परिसरात मोठ्या संख्येने विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट थाटलेले आहेत.
ठळक मुद्देविना परवाना व्यवसाय; नियम धाब्यावरधरण क्षेत्रांतही कारवाईची प्रतीक्षा