सिन्नर : तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गलितगात्र झालेल्या तालुकावासीयांसाठी दिलासादायक बातमी असून, मुंबईहून आलेला पांढुर्ली येथील ४0 वर्षीय बेस्ट बसचालकानेही कोरोनावर मात केली असून, तालुक्यातील तो सातवा कोरोनामुक्त ठरला असून ७ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन केलेले असताना आणि मुंबईत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना पांढुर्ली येथे शिवडे रस्त्यालगत वास्तव्यास असणारा व मुंबईत बीईएसटी चालकाची नोकरी करत असलेला सदरहू इसम मुंबईच्या टिटवाळा परिसरात राहत असून बेस्टमध्ये चालक म्हणून काम करत असताना लॉकडाउनच्या काळात त्याच्यावर कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना बसमधून ने-आण करण्याची जबाबदारी होती. या प्रवासातच त्याला कोरोनाची लागण झाली असावी.सदरहू इसम दि. ९ मे संध्याकाळी मुंबईहून पांढुर्ली येथे आपल्या घरी परतला होता. त्यानंतर त्यास त्रास जाणवू लागल्याने सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी (दि.१२) सकाळी ते उपचारासाठी दाखल झाले. कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य पथकाने १४ दिवस उपचार केले. उपचारानंतर ठणठणीत होऊन हा बेस्टचालक मंगळवारी घरी परतल्याने कुटुंबीयांना दिलासा मिळाला.पांढुर्ली येथे आलेला बेस्ट चालक रुग्णही कोरोनामुक्त झाला असून तो घरी परतल्याने पांढुर्लीकरांसाठी ही आनंदवार्ता ठरली आहे.