नाशिक : बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठावर मानव-बिबट्या संघर्ष सुरू झाला आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने जनजागृतीच्या दिशेने पुढील पाऊल टाकले आहे. बिबट्याच्या सवयींविषयीची माहिती आणि उपाययोजनांबाबत शेतकºयांना जागरूक करण्यासाठी वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या माध्यमातून ‘जाणता वाघोबा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे.गोदावरीच्या खो-यात वसलेल्या नाशिकमधील निफाड तालुका ऊस उत्पादनासाठी सर्वत्र ओळखला जातो. येथील शेतक-यांचे मुख्य पीक ऊस असून, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हादेखील व्यवसाय बहुतांश शेतकरी या तालुक्यात करतात. ऊसशेतीमुळे निर्माण झालेला सुरक्षित अधिवास, प्रजननासाठी योग्य ठिकाण आणि मुबलक खाद्य यामुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठावर मागील काही वर्षांपासून बिबट्यांचे वास्तव्य वाढल्याचे निरीक्षण नाशिक पूर्व वनविभागाने नोंदविले आहे. बिबट्यांना जेरबंद करण्याबरोबरच नागरिकांमध्येही बिबट्याची शास्त्रीय माहिती पोहचावी जेणेकरून बिबट्याविषयी मनात असलेला राग कमी होण्यास मदत होईल आणि बिबट्याच्या हल्ल्यांपासून खबरदारी घेण्याच्या उपाययोजनांबाबतही जागरूकता निर्माण होईल या उद्देशाने ‘जाणता वाघोबा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत निफाडच्या गावागावांमध्ये प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांसह शेतांच्या बांधांवर जाऊन बिबट्याचे जीवशास्त्र, त्याच्या सवयी, हल्ल्याची कारणे, शास्त्रीय संशोधन, मानवी सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देऊन जागृती करण्याचा प्रयत्न असल्याचे वनविभागाचे उपवनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी सांगितले. सदर जनजागृतीपर अभियानाला प्रारंभ करण्यात आला असून, सातत्याने संपूर्ण गोदाकाठालगतच्या गावागावांमध्ये याअंतर्गत कार्यक्रम राबविले जाणार असून, नागरिकांमध्ये बिबट्या या वन्यजिवाविषयीची जागृती निर्माण करण्याबरोबरच संरक्षणाचे धडेही देण्याचा प्रयत्न स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींकडून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सहायक वनसंरक्षक राजेंद्र कापसे यांनी सांगितले.