नाशिक : गेल्या काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एचआरसीटी रिपोर्टमध्ये तब्बल १४ स्कोर आला. मात्र तत्कालीन परिस्थितीत नाशिकमधील रुग्णसंख्येच्या तुलनेत आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याने त्यांना कोणत्याही शासकीय अथवा खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र त्यांनी खचून न जाता एकाच रुग्णालयाबाहेर तब्बल दोन दिवस बेड मिळण्याची प्रतीक्षा करून रुग्णालयात प्रवेश मिळविला आणि आवश्यक ते औषधोपचार घेऊन कोरोनावर मात करीत पुन्हा आपल्या व्यवसायाला सुरुवात केली.
नाशिकरोड येथील रिक्षा स्टॅण्डवर व्यवसाय करणारे अशोक ढेरिंगे मूळचे पळसे येथील आहेत. दैनंदिन व्यवसाय सुरू असताना त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. परंतु, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली. लस घेतल्यानंतर चार ते पाच दिवसांनी त्यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्यात त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे त्यांचा एचआरसीटी स्कोरही तब्बल १४ पर्यंत असल्याचे चाचणीत समोर आल्याने त्यांच्या बंधूंनी त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र शहरातील रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याने काय करावे? असा पेच ढेरिंगे कुटुंबीयांसमोर निर्माण झाला. शहरातील एका रुग्णालयात तब्बल दोन दिवस त्यांनी बेड मिळण्याची प्रतीक्षा केली. अखेर त्यांना दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आवश्यक ते औषधोपचार मिळाले. परंतु, या दोन दिवसांत त्यांनी खचून न जाता धीर धरून खंबीर मनाने बेड मिळण्याची प्रतीक्षा केली आणि त्याच संयम आणि धैर्याच्या जोरावर कोरोनावरही मात केली.
इन्फो-
चारशे किमीहून मुलगा आला धाऊन
कोरोनाच्या भीतीने एकीकडे जवळचे नातेवाईक रुग्णांपासून दूर होत असल्याचे किस्से समोर येत असले तरी दुसरीकडे प्रतिकूल परिस्थितीत अशोक ढेरिंगे कोरोनाशी झुंज देत असताना दौंड येथे एका कंपनीत कार्यरत असलेला त्यांचा मुलगा सागर ढेरिंगे याने वडिलांच्या प्रकृतीची वार्ता कळताच मिळेल त्या साधनाने नाशिक गाठले. त्याने वडिलांना मानसिक आणि भावनिक आधार देत या संकटातूनही बाहेर पडू, असा आत्मविश्वास दिला. कुटुंबीयांनी अशा प्रकारे खंबीर साथ दिल्यानेच या संकटावर मात करता आल्याचे अशोक ढेरिंगे सांगतात.