वडनेर : तीन-चार वर्षांपासून लष्करी अळीचा फटका मका पिकाला बसत आहे. उत्पादन खर्च वाढत असून, उत्पादन कमी होत असल्याचे दिसून येत आहे; परंतु यावर शेतकऱ्यांनी मात करीत यंदाही मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड करून लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचा सामना करीत औषधींची फवारणी करीत मका पीक वाचविण्याच्या प्रयत्न केला आहे.
मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात खरिपातील मका पिकाची पेरणी दोन ते तीन टप्प्यांत झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय होती, अशा शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर मका पेरणी केली. ही आगाऊ पेरणी झालेल्या मक्याला कणसे लागायला सुरुवात झाली आहे, तर पहिल्या, दुसऱ्या कमी-अधिक झालेल्या पावसावर पेरणी झालेल्या मक्याने तुरा काढण्यास सुरुवात केली आहे.
दोन-तीन महिन्यांत थोड्या-फार, तसेच कमी-अधिक पावसावर काही शेतकऱ्यांनी मका लागवड वेगवेगळ्या टप्प्यावर दिसून येत आहे. खरीप हंगामातील हुकमी पीक म्हणून मका पिकाकडे पाहिले जाते; परंतु लष्करी अळीमुळे मका पीक आता हुकमी पीक राहिले नसून यातच अधूनमधून पावसाने दिलेली ओढ कारणीभूत ठरत आहे. बागायत पिकाला खते, वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांची स्थिती चांगली आहे, तर कोरडवाहू जमिनीत केलेली पेरणी पूर्णपणे पावसावरच निर्भर असल्यामुळे मक्याची वाढ कमी-अधिक प्रमाणात झालेली आहे.
सध्या झालेल्या पावसामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रमाणात झालेली आहे. पिकाच्या टप्प्यानुसार मका तुऱ्याची वाढ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिसत आहे. मक्याच्या कणसांना रेशमासारखे तुरे निघण्यास सुरुवात झाली आहे. तुऱ्याचे तीन वेळा रंग बदलत असल्याचे सांगण्यात येते. कणीस लागल्यापासून तर कणीस पूर्ण होईपर्यंत हे रंग दिसून येतात. मक्याच्या वाढीनुसार बियाणाच्या जातीनुसार मध्यम किंवा गर्द गुलाबी रंग येतो. कोरडवाहू व पावसाच्या भरवशावर लागवड केलेल्या मक्याचे पीक तीन ते चार फुटांपर्यंत वाढलेले आहे. बऱ्याच भागात पावसाअभावी मक्याची वाढ खुंटलेली आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचा सामना करीत मका पीक वाचविण्याचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी ठरला आहे. अधिक प्रमाणात झालेला खर्च व उत्पादनात घट झालेली दिसून येणार आहे.