नाशिक : येथील अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या एक दिवसाच्या नवजात अर्भकाने कारोनावर मात केली आहे.या बालकाला जन्मानंतर काही तासातच श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच बाळाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. बाळाच्या हृदयाची गती व रक्तदाब कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्याच्या फुफ्फुसांमध्ये निमोनियाची लक्षणे दिसून आली व बाळाच्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत दोष असल्याचे निदर्शनास आले. त्यात बाळाचा एच आर सिटी स्कोर १२ होता.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मधील बाल रोग तज्ज्ञ आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. सुशील पारख, बालरोग तज्ज्ञ डॉ. नेहा मुखी (बालरोग तज्ञ, डॉ. पूजा चाफळकर यांनी या बाळावर उपचार करण्यास सुरुवात केली. आधुनिक तंत्रज्ञान व अत्याधुनिक सुविधा, सर्व ज्युनियर डॉक्टरांचे परिश्रम व उपचार पद्धती याच्या जोरावर १८ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर या बाळाचा जीव वाचविण्यात टीमला यश मिळाले आहे.यामध्ये हॉस्पिटल मधील प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ व ज्युनियर डॉक्टर यांच्या परिश्रमाने बाळ त्या नंतर सुखरूप घरी गेले आहे.आई गर्भवती असताना शेवटच्या तीन महिन्यात बाळाच्या आईला नकळतपणे कोविडचा जंतुसंसर्ग झाल्याचे निदर्शनास आले व त्यानंतर बाळाच्या आई मध्ये निर्माण झालेले अँटीबॉडीज नाळद्वारे बाळाच्या शरीरामध्ये पोहोचले व त्यामुळे बाळाच्या फुफ्फुस, हृदय, व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला. एक दिवसाच्या बाळामध्ये निदर्शनास आलेली एफआयआरएस जगात एखाद दुसऱ्या घटनेचा उल्लेख वैद्यकीय शास्त्रात आहे. भारतात ही पहिली घटना आहे असे डॉ. सुशील पारख यांनी सांगितले.