नाशिक : येथील वनविभागात कार्यरत असताना मयत झालेल्या एका वनरक्षकाची सेवापुस्तिका गहाळ झाल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्यस्तरावर या प्रकारणाची गंभीर दखल घेतली गेली. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील वन कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका अशाचप्रकारे शासकिय दप्तरांमधून गहाळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वनविभागाच्या सचिवांच्या आदेशानुसार नागपूरला या आठवड्यात याबाबत आढावा घेण्यासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी विशेष बैठक बोलविली आहे. बैठकीला राज्यभरातील मुख्य वनसंरक्षकांसह उपवनसंरक्षकांंना पाचारण करण्यात येणार असल्याचे समजते.वनविभागात १३ वर्षे सेवा बजावल्यानंतर काही वर्षे गैरहजर राहून मयत झालेलेवनरक्षक चंद्रकांत बन्सीलाल पवार यांच्या सेवापुस्तिकेचा शोध लागत नव्हता. यामुळे त्यांच्या वारसांना सतत वनविभागाच्या कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहे. याकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधल्यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली आणि सेवापुस्तिकेची शोधाशोध ‘पुर्व-पश्चिम’च्या दिशेने सुरू झाली. पवार यांची सेवापुस्तिका १९९६ साली पश्चिम विभागाकडे पाठविल्याची नोंद अखेर पूर्व विभागाच्या दप्तरी आढळून आली.नाशिक पश्चिम वनविभागाच्या इगतपुरी परिक्षेत्रातील काळुस्ते गावात वनरक्षक पदावर कार्यरत असताना चंद्रकांत बन्सीलाल पवार यांचे २९ एप्रिल २०१६ साली निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. पवार हे १९८३ साली वनखात्यात वनरक्षक या पदावर नोकरीस लागले. पूर्व विभागाच्या नांदगाव परिक्षेत्रात कर्तव्य बजावल्यानंतर त्यांची बदली १९९६ साली पश्चिम विभागात झाली. दरम्यान, १९९६ साली डिसेंबर महिन्याअखेरीस ते थेट वीस वर्षे गैरहजर राहिल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याकडे तत्कालीन अधिकाºयांकहून तेव्हा दुर्लक्ष केले गेले आणि गुंता अधिकच वाढला. दरम्यान, ४ आॅक्टोबर १९९६ साली पवार यांची सेवापुस्तिका पश्चिम विभागाकडे पूर्व विभागाकडून पाठविण्यात आल्याची नोंद जावक नोंदवहीत मिळून आली . यामुळे सेवापुस्तिका पश्चिम विभागाकडून यानंतर गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले.सेवानिवृत्तांनाही ‘वाईट’ अनुभववनरक्षकांच्याच नव्हे तर उपवनसंरक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठांच्या सेवापुस्तिका गायब असल्याची चर्चा वनविभागात दबक्या आवाजात सुरू आहे. कर्मचारी,अधिकाºयांच्या मिळून सुमारे दोनशे सेवापुस्तिका हरविल्याचे समजते. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचा-यांना प्रशासकीय गलथान कारभाराचा ‘वाईट’ अनुभव येत आहे.धाबे दणाणले; माहितीची जुळवाजुळवनागपूरला होणा-या बैठकीला अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता स्वत: उपस्थित राहणार आहेत. गुप्ता हे प्रत्येक जिल्ह्याच्या उपवनसंरक्षकांकडून सेवापुस्तिकांची माहिती जाणून घेणार असल्याचे समजते. त्यामुळे सध्या अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत.