सिन्नर (शैलेश कर्पे) : गणपतीपाठोपाठ रविवारी घरोघरी गौरींचे आगमन होणार असून, गौराईला (महालक्ष्मी) सजवण्याकरिता यंदा ऑक्साइड दागिन्यांचा ट्रेण्ड बाजारात पहायला मिळत आहे. अत्यंत आकर्षक, सुबक अशा या दागिन्यांच्या खरेदीकरिता महिलावर्गाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी आपल्या लाडक्या गणेशाचे आगमन झाल्यानंतर रविवारी गौरींचे आगमन होत आहे. हातात एकच दिवस खरेदीसाठी असल्याने अनेकांनी यापूर्वीच गौरीची खरेदी केली आहे. बाजारपेठ गौरी गणपतीच्या सजावटीच्या वस्तूंनी सजली आहे. आकर्षक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे. विविध आकारातील गणपती व गौरीच्या मूर्ती, गौरीचे मुखवटे यांच्यासह दागिने, रेडिमेड साड्यांच्या खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू आहे.
गौरीचे पितळी, शाडू माती आणि पीओपीचे मुखवटे बाजारात उपलब्ध आहेत. सुबक आकारातील आखीव रेखीव मुखवटे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. गौरीसाठी लागणारा दागिन्यांचा साज लक्ष वेधून घेणारा आहे. सोनेरी रंगातील दागिने आणि ऑक्साइड दागिने यंदा आकर्षण ठरले आहेत. ऑक्साइड दागिन्यांना महिलावर्गाची पसंती आहे. गौरीच्या सजावटीच्या वस्तूंच्या दरात १० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसते. दागिन्यांमध्ये मोहनमाळ, ठुशी, बोरमाळ, लक्ष्मीहार, चपला हार, मोत्याचे सर, कोल्हापुरी साज, चंद्राचे मंगळसूत्र, कमरपट्टा, मुकुट, बाजूबंद, झुमके, जुडापीन, कानातील झुबे, वेल, पूर्ण कानवेल आदी पारंपरिक पद्धतीचे वैविध्यपूर्ण अलंकार पहायला मिळतात. मंगळसूत्रातही विविध प्रकार उपलब्ध आहेत. हे दागिने २०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. पाचवारी आणि नऊवारी या दोन्ही प्रकारात रेडिमेड साड्या उपलब्ध आहेत. इमिटेशन ज्वेलरीकडे महिलांचा कल असल्याचे दिसते
----------------------------
गणपतीसाठीही सजावटीचे दागिने
यंदा गणरायासाठी विविध सजावटीचे दागिने बाजारात आले आहे. त्याचबरोबर गजंतलक्ष्मी, मूषक, मोदक, आंब्याचे पान, अष्टविनायक पान, मोत्यांच्या मण्यांच्या बाली. मुकुट, शाल, नेकलेस, शेला, कमळाचे फूल, जास्वद फूल, मोदकाचे नेकलेस, दुर्वा यांचे देखील दागिने विक्रीसाठी आहेत. सोने, चांदी आणि इमिटेशन ज्वेलरी बाजारात उपलब्ध आहे.
--------------------
‘खणा’च्या साडीची ही क्रेझ
महालक्ष्मी (गौराई)ला पारंपरिक नऊवारी किंवा रंगीबेरंगी साड्या व पारंपरिक दागिने घालून सजवण्याची परंपरा अजूनही जोपासली जाते. मात्र आता ऑनलाइनच्या जमान्यात महिलांच्या राहणीमानात बदल झाला आहे. त्यामुळे महालक्ष्मीला आता ऑनलाइन ‘खणा'च्या साड्या बोलावून सजावटीत आधुनिकतेचा साज शृंगार चढविला जात आहे. खणाच्या साडीसोबतच ऑक्साइड दागिन्यांना मागणी वाढली आहे.
(१० गौराई)
100921\10nsk_6_10092021_13.jpg
१० गौराई