दिंडोरी (भगवान गायकवाड ) : शासनाच्या निधीसोबतच लोकसहभागातून ११७ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देत वणी व दिंडोरी येथे प्रत्येकी एक कोटीचे दोन ऑक्सिजन प्रकल्प मंजूर केले असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी दोन नवीन ऑक्सिजन बेड युक्त कोविड सेंटरचे काम प्रस्तावित करण्यात आले. तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वीच विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांनी आढावा बैठक घेत उपाययोजना सुरू केल्या.
पहिल्या लाटेवेळी अगोदर पिंपरखेड व नंतर बोपेगाव आश्रमशाळेत कोविड सेंटर सुरू केले. सुमारे ५० लाख आमदार निधीतून सर्व आरोग्य केंद्रात विविध वैद्यकीय साहित्य तातडीने पुरविण्यात आले. रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. वणी येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये ३० ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले होते. सदर सेंटर दुसऱ्या लाटेत चांगले उपयोगी ठरले. अचानक रुग्ण वाढल्याने साऱ्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला . दिवसागणिक वाढणारे हॉटस्पॉट व सरकारी दवाखान्यातील बेड कमी पडू लागले. झिरवाळ यांनी तातडीने प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, दिंडोरी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. विलास पाटील, वणी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र बागुल यांची तातडीने बैठक घेत पुढील उपाययोजनांबाबत चर्चा करत वणी येथे ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त ऑक्सिजन बेडचे सेंटर करण्याचे ठरले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालय इतर रुग्णांसाठी खुले ठेवत आयटीआयच्या वसतिगृहात कोविडं सेंटर उभारणीची तयारी करण्यात आली. यासाठी शासन निधीसह लोकसहभागातून निधी जमा करत जास्तीत जास्त बेड सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला . तालुक्यातील कंपन्या,उद्योजक,व्यापारी ,सरकारी कर्मचारी, नागरिक यांना लोकसहभागाचे आवाहन करण्यात आले. त्यास मोठा प्रतिसाद मिळत लाखोंची मदत उभी झाली. वणीत अतिरिक्त ३० बेड कार्यान्वित झाले तर दिंडोरीत ५७ ऑक्सिजन बेडची उभारणी करण्यात आली असे तालुक्यात ११७ ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले. यात सिग्राम कंपनी,सह्याद्री आदी कंपन्यांसह अनेकांनी मदतीचा हात दिला. ऑक्सिजन कमतरता भासली त्यावेळी एकाच दिवसात सुमारे ६० ऑक्सिजन सिलिंडर उद्योजकांनी तहसीलदार यांचेकडे जमा केले. (१० दिंडोरी एमएलए)
-----------------------
दिंडोरी तालुक्यात कोरोना काळात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या निधी सोबत लोकसहभागातून जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा मिळवून देण्यात आली. जनतेच्या सहकार्यामुळे वणी व दिंडोरीत अतिरिक्त ऑक्सिजन बेड सुरू करणे शक्य झाले. अजून वारे व बोपेगाव येथे वाढीव सुविधा सुरू करावयाच्या आहेत. १०० टक्के लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील.
- नरहरी झिरवाळ. विधानसभा उपाध्यक्ष
------------------------
-आमदार निधीतून ५० लाखांचे वैद्यकीय साहित्य पुरवठा, एक कोटींची तरतूद
-वणी येथे ६० तर दिंडोरीत ५७ ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर
-बोपेगाव व वारे येथे प्रस्तावित कोविड सेंटर
- दररोज शासकीय प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क आढावा व नियोजन
-दिंडोरी ग्रामीण रुग्णालयास सीएसआर मधून रुग्णवाहिका
-वणी कोविड सेंटर २
तालुक्यात ११७ ऑक्सिजन बेड